१. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याजवळचं, 'भावार्थ.. पुस्तकं आणि बरंच काही' नावाचं दुकान. कलेक्शन आणि विषयांची, लेखकांची रेंज चांगलीय. एकाच शेल्फच्या एका कप्प्यात सेम पुस्तकाच्या थप्प्याच्या थप्प्या रचलेल्या दिसत नाहीत. काही दुकानांमध्ये एकेका लेखकाला/लेखिकेला एकेक कप्पा ॲलॉट केलेला दिसतो. इथं तसं नाही. दोन विरूद्ध टोकाचे लेखकही इंटरेस्टिंगली शेजारी शेजारी दिसू शकतात. दरवाजा ढकलून आत गेल्यावर बाहेरची दुनिया कटऑफ. समोर सदोदित वाहणारं ट्रॅफिक आहे, पण आत किंचितही आवाज जाणवत नाही. खिडक्यांच्या काचांतून झिरपत आत येऊन शालीनपणे पसरणारा नैसर्गिक उजेड. वाचनासाठी कंफर्टेबल डिफ्यूज्ड लाईट्स. एकूणच ॲंबियन्स, ध्वनी-प्रकाश संयोजन-रचना-पोत, या सगळ्यांमागे कुणीतरी शहाणा माणूस असावा. कधीतरी अर्धा-एक तास रेंगाळून जाण्यासाठी चांगली जागा आहे.
२. पाऊस रिमझिम दिवसभर. अशा संध्याकाळी शांत बसून चहा पिण्यासाठी फर्ग्युसनचं कॅन्टीन ही चांगली जागा आहे. चहापण चांगलाय. कमी गोड, आलं घातलेला. मॅनेजमेंट संघाचं असलं तरी चहा चांगलाय. समोर पावसामुळं आरशासारखी स्वच्छ झालेली झाडं. न्हाऊ माखू घातलेल्या ब्रिटिशकालीन देखण्या इमारती. अशी जागा जुन्या शैक्षणिक कॅंपसमध्येच असू शकते. कसलं डीप वाटतं पाऊस बघत गाणी ऐकताना. असं नेहमीच वाटणार असेल तर आयुष्यभर इथंच बसून रहायला हरकत नाही. पण कधीतरी सगळे निघून गेल्यावर त्यांनी एकेक लाईट्स बंद केल्या. मग उठून हळूहळू त्या इमारतींच्या मधून चालत चालत बाहेर पडलो. काहीतरी बरं लिहिलं पाहिजे, असं वाटतं. पण हे असे जगण्याबद्दल रोज थोडे थोडे निष्कर्ष काढणं नको. संपूर्ण जगून झाल्यावर मरतानाच्या क्षणी एकदाच काय ते निष्कर्ष काढायला पाहिजेत. म्हणजे मग ते बदलणार नाहीत. किंवा बदलायची वेळ येणार नाही. किंवा बदलायचा चान्सच मिळणार नाही.
३. जोडून सुट्ट्या आल्या की शहरांतून बाहेर पडण्यासाठी वाहनांच्या, बसेसच्या, व्हॉल्वोजच्या रांगा पसरतात सर्वदूर.
परंतु काळजीचं काही कारण नाही. वीसेक वर्षांत हा प्रश्नही भगवानभरोसे आपोआप मिटून जाईल. तेव्हा सगळी गावं, शहरं, निमशहरं, महानगरं एकमेकांमध्ये घुसून कायमची हरवून गेलेली असतील. मुंबई पुणे नाशिक नगर औरंगाबाद सोलापूर सातारा सांगली कराड कोल्हापूर यांचा मिळून एक महाकाय अफाट मानवी समुद्र पसरलेला असेल सगळीकडे. झंझटच खतम.
४. डॉ. गणेश देवींचं 'वानप्रस्थ' वाचलं. मनातली खळबळ शांत करणारं पुस्तक आहे. रोजच्या तक्रारी असतातच, अमुक झालं, तमुक झालं. पण काही पुस्तकं सगळं विसरायला लावतात. भाषेचं-काळाचं भान, गांभीर्य, समजूत देतात. 'वानप्रस्थ' त्यापैकी एक.
डॉ. देवी मोठे भाषातज्ज्ञ, विचारवंत आहेत. कृतिप्रवण विचारवंत आहेत. नुसतं लिहून बोलून थांबत नाहीत. जबाबदारी मानतात स्वतःची. तेजगढची आदिवासी अकादमी, भाषा रिसर्च सेंटर सारखी मोठी टिकाऊ कामं उभी केलीयत. शिवाय भाषांचं लोकसर्वेक्षण, दक्षिणायन चळवळ आणि काय काय करतात हे. कुठून एवढी ऊर्जा, आत्मबळ आणतात या वयात? त्रास लिहितानाही किंचाळणं नाही, आक्रोश नाही. काही आकस नाही कुणाविषयी. एकप्रकारची सर्जनशील निवृत्ती दिसते. नेहमी अशी सुजनतेची भाषा बोलायला कसं काय जमत असेल? हे म्हणजे एखाद्या ऋषी सारखंच झालं. आपण काही गांधींच्या काळात जन्मलो नाही, त्यांना बघू शकलो नाही. हरकत नाही. गणेश देवी तर आहेत या काळात.
डॉ. देवींच्या पुस्तकांच्या प्रभावाखाली आल्यानंतर, त्यांची यूट्यूब वरची व्याख्यानं, मुलाखती ऐकण्याचा सपाटा चालू झाला. प्रचंड वाचन चिंतन करणाऱ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत असेल अशी डूब. आणि स्वतःचे स्वतंत्र भविष्यवेधी विचार. ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं कौशल्य. पाच मिनिटांत विषयाच्या गाभ्याला हात घालतात, बुडून जातात. भविष्याबद्दल इंटेन्स बोलतात. तळमळीनं बोलतात, पण हट्टाग्रह जराही नाही. 'हे असं असं आहे, हे असं असं पुढं होण्याचा धोका आहे. विचार करा.' एवढंच म्हणणं.
अवाक् होऊन ऐकत रहावं, असा एकेक प्रकार. जेव्हा ते बोलायचं थांबतात, तेव्हा नुकतंच जे ऐकलंय ते मनाशी घोळवत असताना, मनात फक्त आदराची भावना उरते. भाषांचा अभ्यास करता करताच देवी सर एवढे शांत झाले असावेत. आणि शब्द किती संयतपणे वापरतात यार हे.! त्यांची ती संथ लयीतली भाषा ऐकल्यावर इतर कुठला कर्कश आवाज ऐकूच वाटत नाही. त्यांच्या प्रभावामुळे आजकाल आपल्याही भाषेत थोडासा बदल जाणवतोय. हे चांगलंय म्हणजे.
५. बरीच रात्र झाल्यावर कृष्ण बलदेव वैदचं 'उसका बचपन' वाचायला घेतलं. वैदनी चांगलाच दणका दिला. एवढं कातिल पुस्तक आपल्याकडे बरेच महिने न वाचता पडून होतं याचा पश्चात्ताप.!
झपाझप वाचत राहिलो. त्यातला तो बीरू नावाचा मुलगा. त्याचं लहानपण. बीरूचा बाप जुगार खेळतानाचा एक प्रसंग. आणि त्याला त्याचा शिक्षक मारत असतो तो एक प्रसंग..! कहर लिहिलंय. एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखं. ऑक्टोपस सारखे दहा दहा हात आहेत याला. जखडतोच डायरेक्ट. तर मग रात्रभर जागरण. आणि मग आज सकाळभर काल वाचलेल्या प्रसंगांचे पडसाद. हिंदी वाचून वाचून आपल्याला स्वप्नंपण हिंदीतनंच पडायला लागलीत आता. ही एक वेगळीच भानगड झाली च्यायला.
६. सलग कृष्ण बलदेव वैद वाचल्यावर निर्मल वर्मा, मानव कौल नको वाटतात. फार कीस काढतात ते. तेच नेहमीचं एकांताचं भावुक कोमल तत्वज्ञान. शहरी किंवा तत्सम युरोपियन धर्तीचं लिखाण. एकलकोंडं. जीवनाचा अभाव असलेलं. ढग, पाऊस, झाडं यांची वर्णनं फार.! कॅफेत, डोंगरात, लॉजमध्ये, बारमध्ये बसून आजूबाजूला बघत वर्णनं करत बसतात. यांच्याकडे लिहायला दुसरं काही नाहीये काय? समाज, समूह येतच नाहीत यांच्या लिहिण्यात. हे ती क्षमताच हरवून बसलेत की काय?
संवादही फक्त दोन माणसांतले. नाहीतर मग मनातल्या मनात काय वाटतं ते विस्तारानं आळवत राहतात. कधीकधी एखादं विलक्षण वाक्य लिहितात, पण त्याआधी आव खूप आणतात. लेखक असणं म्हणजे कायतरी पवित्र असल्याचा आव.! मी असं लिहितो न् मी तसं लिहितो वगैरे.! यांना स्वतःचा असा समाज, जात-बित काही नाही. हे सेलिब्रिटींसारखे जगभर फिरतात ऐशमध्ये. यांचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत. समाज, देश, विचारसरणी कशाचं काही नाही यांना. हे अधूनमधून बरं वाटतं. पण सदैव नाही. रिपल्शन यायला लागतं मग वाचताना. लेखक असा एवढा समाजापासून तुटून चालत नाही. फार काही भारी अवस्था नाही ती..! नेमाडे, पठारे, मनोहर श्याम जोशी, ग्यान चतुर्वेदी, मीतर सेन मीत बरे.! ते कादंबरीत सगळं जग, वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या बोली, आवाज, खटकेदार संवाद, सगळी किलबिल, सगळा कोलाहल, सगळी गजबज घेऊन येतात. अर्थात त्यांचा लिहिण्याचा काळही वेगळा होता, हे एक आहेच.
७. तहसीन युचेलचं ‘स्कायस्क्रेपर्स’ हे तुर्की अनुवादित पुस्तक पुस्तकपेठेतून आणलं. अनुवाद बकवास आहे. उरकायचं म्हणून उरकलेलंय. इंग्रजी वाक्यं जशीच्या तशी उचलून मराठीत आणलीयेत. त्यामुळे अर्थ लावायला वाक्य पुन्हा वाचावं लागतं. मध्येमध्ये हे असे स्पीड ब्रेकर लागतात. लिंक तुटते. एवढ्या खराब अनुवादाऐवजी सरळ इंग्रजीच वाचलं असतं. छापण्यापूर्वी सगळं पुन्हा एकदा वाचून बघायलं हवं होतं त्यांनी.
संपादन नावाची काही गोष्ट असते की नाही? साडेचारशे रूपै वाया गेले..!
अक्षरधारा च्या प्रदर्शनातून त्र्य. वि. सरदेशमुखांवरचं 'जवळिकीची सरोवरे' आणलं. एवढं काही खास नाही. समीक्षात्मक टिपणं आणि जुन्या मराठी कवी/लेखकांबद्दलची मतं आहेत. भाषा अलंकृत आहे. असलं आता वाचवत नाही. अत्रे, माटे, फडके, खांडेकर, श्रीपु, बालकवी, मर्ढेकर वगैरे नावं बघितली तरी डोकं उठतं. बाकी, सरदेशमुखांचं 'डांगोरा एका नगरीचा' मात्र फारच चांगलं आहे.
८. GandhiServe' वर महात्मा गांधींच्या भाषणांचे रेकॉर्डिंग्ज आहेत. ऐन दंगलींच्या काळात प्रार्थना सभांमधली गांधींची भाषणं. निर्वासितांच्या छावण्या, रडणारी लहान बाळं, स्त्रिया. सगळा आकांत. गांधींची समजावणीची भाषा. सांत्वनाचे हळूवार शब्द. देवाचा आवाज..!! 'मला तुमच्यासोबत जिवंत रहायचं आहे', म्हणतायत गांधी. रडू येतं.
अशा भयाण वणव्यात डोकं ताळ्यावर ठेवणं हेच मुळात कठीण. शांतपणे विचार करणं त्याहून कठीण. वातावरण निवळण्यासाठी लोकांमध्ये उतरण्यात जीवाचा धोका. गोष्टी बिघडवायला काही कष्ट लागत नाहीत, जोडायला लागतात. दंगली थांबवल्या या माणसानं कलकत्त्यात. त्यातनं ज्या निष्पापांचे जीव वाचले असतील, त्यांना जाऊन विचारा म्हणावं गांधी काय होते.!
९. पंधरा ऑगस्ट. चुकून एक शाळा. तिथं चाललेलं झेंडावंदन.
शाळेतली मुलं-मुली 'सारे जहाँ से अच्छा' म्हणतायत. त्यांचा तो प्रार्थनेसारखा घुमणारा स्वर. अनेकांच्या कंठांतून एकाच वेळी निघणाऱ्या आवाजांची हार्मनी. हे गाणं तसंही एकट्याने/एकटीने गाण्याचं नाहीचे, समुहगान आहे. शतकातून एखाद्या गाण्याच्या पदरी असं भाग्य येतं की आख्खा देश त्याला आपलं गाणं म्हणून उचलून धरतो, पिढ्यानपिढ्या गात राहतो. कारण त्या ओळीच तशा आहेत.
ऐ आब-रूद-ए-गंगा वो दिन है याद तुझ को,
उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा
कवी इक्बाल त्या सर्वसाक्षी गंगेला विचारतायत की तुला आठवतोय का तो दिवस? जेव्हा हजारो वर्षांपूर्वी कधीतरी आमचे पूर्वज तुझ्या काठावर रहिवसले होते??
अंगावर काटा वगैरे..!