Sunday, 24 August 2025

'आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’ -- पुस्तक अभिप्राय

असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे एवढं भारी बोलत आहे? दिसलं की निसर्गदत्त महाराज म्हणून कुणीतरी आहेत, त्यांचे हे विचार आहेत. म्हटलं की असतील कुणीतरी महाराज, असे खूप असतात‌‌.

रजनीश, कृष्णमूर्ती, युजीनी, एकहार्ट टॉल, मूजी, थिच नॅथ हन्ह, सत्यनारायण गोयंका, शुनरू सुझूकी, मायकेल सिंगर, ॲलन वॅट्स अशांसारख्या अनेक देशी-विदेशी महाराजांचे विचार ऐकून वाचून माहिती झाले आहेत. सतत नवनवीन स्पिरीच्युअल खाद्य शोधण्याचा मनाला चाळा लागलेला आहे. इलाज नाही. (बाकी, मजल ऐकण्या-वाचण्यापुरतीच. त्या क्षेत्रातला वैयक्तिक अनुभव झिरो आहे, हे मी जे लिहितोय त्यावरून लक्षात येतच असेल.)
अशा पार्श्वभूमीवर या निसर्गदत्त महाराजांचे विचार आणखी काही दिवस आणखी ऐकत राहिल्यानंतर कुतूहलाची तीव्रता वाढली. मग अजून थोडी शोधाशोध केली की कोण आहेत हे? नाव तर अगदीच देशी ('ग्राम्य'!) वाटतंय. कुठल्या राज्यातले असावेत? आणि मूलतः ते कुठल्या भाषेत बोलले असावेत? त्यांची आणखी काही पुस्तकं आहेत काय ?

तर समजलं की त्यांचं मूळ नाव- मारूती शिवरामपंत कांबळी.! म्हणजे चक्क मराठी निघाले ! आश्चर्याचा धक्का.! Goosebumps की काय म्हणतात तसलं काहीतरी.

म्हटलं, अशी कशी उलटी गंगा वाहायला लागली. असा असा एक बुद्धपुरूष आपल्या भाषिक अवकाशात होऊन गेला, आणि आजवर आपल्याला पत्ताच नव्हता. त्यांचं नाव पहिल्यांदा माहिती झालं तेही इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, हा किती करंटेपणा.!

तर निसर्गदत्त महाराज. एनलाईटन्ड मनुष्य. साधंसुधं शांत निर्मळ जीवन. कुठे कसला आश्रम नाही, बुवाबाजीचा हव्यास नाही, विद्वत्ता पाजळणं नाही, प्रवचनांचा सोस नाही, शिष्य-शिष्यिणींचा बाजार वगैरे असलं काही नाही. धर्म, धर्मग्रंथांचे दाखले, कर्मकांड यांना पूर्ण फाटा.!

तथाकथित व्यावहारिक अर्थानं त्यांचं शिक्षण बेताचंच. उदरनिर्वाहासाठी एक छोटंसं दुकान होतं. तर त्यांच्याकडे लोक यायचे. चिंता, समस्यांबद्दल बोलायचे. महाराज उत्तरं द्यायचे. किंवा उत्तरं त्यांच्या आतून उमटायची. लोकांशी त्यांचा हा प्रश्नोत्तररूपी संवाद घरगुती मराठीतूनच चाललेला असायचा.

मॉरिस फ्रिडमन म्हणून एक पोलंडचे मनुष्य होते. अध्यात्मिक शोधयात्रेदरम्यान ते भारतात आलेले असताना त्यांना महाराजांबद्दल समजलं. आणि ते त्यांना वारंवार भेटत राहिले. महाराज मराठीत काय बोलताहेत, हे तिथे उपस्थित असलेले कुणीतरी फ्रीडमनना इंग्रजीत अनुवाद करून सांगे. फ्रीडमननी या संवादांची महत्ता जाणली. आणि या संवादांचं संकलन/टेप रेकॉर्डिंग करून ते ‘आय ॲम दॅट’ या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशात आणलं, १९७३ साली. नंतर पुढे या पुस्तकाचा जगभरातील पस्तीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला.

महाराज मराठीत बोलतानाचे आणि लोक त्यांचा अनुवाद करून सांगतानाचे त्याकाळचे काही व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. शोधून शोधून पाहिले. एक थोर तत्ववेत्ता मराठीत बोलतोय आणि त्यांचे ते असाधारण शब्द समजून घेऊन ते भांडार जगापुढे आणण्यासाठी कुणीतरी विदेशी माणूस जीवाचा आटापिटा करतोय, हे दृश्य एक मराठी भाषिक म्हणून अतीव सुखाचं वाटतं. (ईगो सुखावतो म्हटलं तरी हरकत नाही.!)

खाली दोन पुस्तकांचा एकत्रित फोटो टाकलेला आहे. ‘I am that’ हे त्यांचं गाजलेलं इंग्रजी पुस्तक. आणि शेजारी त्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे- ’सुखसंवाद’!

‘I am that’ हे पुस्तक प्रिंटेड/ पीडीएफ/ ऑडिओ स्वरूपात सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. पण हे जे मराठी ‘सुखसंवाद’ पुस्तक आहे, त्याचा तपास लावण्यासाठी पुण्यातली एकूण एक छोटी-मोठी दुकानं पालथी घालून झाली. मिळालं नाही. म्हटलं की जुन्या काळी कधीतरी प्रकाशित झालं असेल आणि नंतर आवृत्त्या निघाल्या नसतील. आता मिळणार नाही, म्हणून नाद सोडून दिला. पण नंतर एकदा असाच दगडूशेठ गणपतीच्या समोरच्या इमारतीत एक चांगला टी स्टॉल आहे, तिथे चहा प्यायला निघालेलो. जाताजाता सहज ‘नेर्लेकर बुक डेपो’ नावाच्या एका धार्मिक साहित्य विकणाऱ्या पुस्तकाच्या दुकानात सहज नजर टाकली तर थेट समोरच शेल्फवर ‘सुखसंवाद’ दिसलं. छातीच्या डाव्या भागात रक्ताची छोटीशी उसळी वगैरे. लगेच घेऊन टाकलं. एखादं पुस्तक बघून एखादा ग्राहक एवढा कसा एक्साईट होऊ शकतो, हे त्या दुकानदाराला कळलं नसल्यास तो त्याचा दोष म्हणता येणार नाही.

तर ‘सुखसंवाद’. ६६४ पानांचं पुस्तक. आता कुणाला वाटेल की भावनेच्या भरात वाहवत जाऊन ‘मी नुकतंच कित्ती कित्ती भारी पुस्तक वाचलं’ याची दवंडी पिटायला आलो आहे. तर तसं काही नाही. या पुस्तकाबद्दल खरंतर मला काही बोलायचंच नाही आहे. त्याबद्दल एक शब्दही बोलण्याचा माझा आवाका नाही‌. अधिकारही नाही. आणि हे खरंच आहे म्हणजे.

जवळपास तीन-साडेतीन महिन्यांपासून मी ते वाचतो आहे. जरूर पडल्यास असावं म्हणून ते नेहमी जवळपास असेल याची काळजी घेतो आहे. आयुष्य आपापलं भलंबुरं चाललेलंच असतं. इतरही काय काय चाललेलं असतं. त्यातून अधूनमधून हे पुस्तक उचलतो. कुठलंही एखादं पान उघडून आत शिरतो. दोन-चार पानं वाचून झाली की विरघळतो. आणि वेगळाच कुणीतरी होऊन बाहेर पडतो. एखाद्या व्यक्तीच्या आतून कुठल्याही प्रश्नासाठी एवढ्या खोलवरची उत्तरं उमटू शकतात.! जगाकडे एवढ्या वेगळ्या पद्धतीनं पाहता येऊ शकतं.! आश्चर्य आहे !

अध्यात्मिक विषयावर इतकं विलक्षण, इतकं स्पष्ट, इतक्या अधिकारवाणीनं तरीही इतक्या विनम्रपणे क्वचितच कुणी बोललं असेल, असं वाटतं. आता उगाच सतत अधिकाधिक वाचत राहण्याचं कंपल्शन, वाचनाची वसवस करत राहण्याची काही गरज नाही, असं वाटतं. आयुष्यभर वाचत-घोळवत रहायचं म्हटलं तरी हे एकच पुस्तक पुरून उरण्यासारखं आहे. वाचावं, पुरवून पुरवून रवंथ करावा, संपलं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी ! 



No comments:

Post a Comment

'आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’ -- पुस्तक अभिप्राय

असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे ...