Sunday, 24 August 2025

'आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’ -- पुस्तक अभिप्राय

असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे एवढं भारी बोलत आहे? दिसलं की निसर्गदत्त महाराज म्हणून कुणीतरी आहेत, त्यांचे हे विचार आहेत. म्हटलं की असतील कुणीतरी महाराज, असे खूप असतात‌‌.

रजनीश, कृष्णमूर्ती, युजीनी, एकहार्ट टॉल, मूजी, थिच नॅथ हन्ह, सत्यनारायण गोयंका, शुनरू सुझूकी, मायकेल सिंगर, ॲलन वॅट्स अशांसारख्या अनेक देशी-विदेशी महाराजांचे विचार ऐकून वाचून माहिती झाले आहेत. सतत नवनवीन स्पिरीच्युअल खाद्य शोधण्याचा मनाला चाळा लागलेला आहे. इलाज नाही. (बाकी, मजल ऐकण्या-वाचण्यापुरतीच. त्या क्षेत्रातला वैयक्तिक अनुभव झिरो आहे, हे मी जे लिहितोय त्यावरून लक्षात येतच असेल.)
अशा पार्श्वभूमीवर या निसर्गदत्त महाराजांचे विचार आणखी काही दिवस आणखी ऐकत राहिल्यानंतर कुतूहलाची तीव्रता वाढली. मग अजून थोडी शोधाशोध केली की कोण आहेत हे? नाव तर अगदीच देशी ('ग्राम्य'!) वाटतंय. कुठल्या राज्यातले असावेत? आणि मूलतः ते कुठल्या भाषेत बोलले असावेत? त्यांची आणखी काही पुस्तकं आहेत काय ?

तर समजलं की त्यांचं मूळ नाव- मारूती शिवरामपंत कांबळी.! म्हणजे चक्क मराठी निघाले ! आश्चर्याचा धक्का.! Goosebumps की काय म्हणतात तसलं काहीतरी.

म्हटलं, अशी कशी उलटी गंगा वाहायला लागली. असा असा एक बुद्धपुरूष आपल्या भाषिक अवकाशात होऊन गेला, आणि आजवर आपल्याला पत्ताच नव्हता. त्यांचं नाव पहिल्यांदा माहिती झालं तेही इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, हा किती करंटेपणा.!

तर निसर्गदत्त महाराज. एनलाईटन्ड मनुष्य. साधंसुधं शांत निर्मळ जीवन. कुठे कसला आश्रम नाही, बुवाबाजीचा हव्यास नाही, विद्वत्ता पाजळणं नाही, प्रवचनांचा सोस नाही, शिष्य-शिष्यिणींचा बाजार वगैरे असलं काही नाही. धर्म, धर्मग्रंथांचे दाखले, कर्मकांड यांना पूर्ण फाटा.!

तथाकथित व्यावहारिक अर्थानं त्यांचं शिक्षण बेताचंच. उदरनिर्वाहासाठी एक छोटंसं दुकान होतं. तर त्यांच्याकडे लोक यायचे. चिंता, समस्यांबद्दल बोलायचे. महाराज उत्तरं द्यायचे. किंवा उत्तरं त्यांच्या आतून उमटायची. लोकांशी त्यांचा हा प्रश्नोत्तररूपी संवाद घरगुती मराठीतूनच चाललेला असायचा.

मॉरिस फ्रिडमन म्हणून एक पोलंडचे मनुष्य होते. अध्यात्मिक शोधयात्रेदरम्यान ते भारतात आलेले असताना त्यांना महाराजांबद्दल समजलं. आणि ते त्यांना वारंवार भेटत राहिले. महाराज मराठीत काय बोलताहेत, हे तिथे उपस्थित असलेले कुणीतरी फ्रीडमनना इंग्रजीत अनुवाद करून सांगे. फ्रीडमननी या संवादांची महत्ता जाणली. आणि या संवादांचं संकलन/टेप रेकॉर्डिंग करून ते ‘आय ॲम दॅट’ या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशात आणलं, १९७३ साली. नंतर पुढे या पुस्तकाचा जगभरातील पस्तीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला.

महाराज मराठीत बोलतानाचे आणि लोक त्यांचा अनुवाद करून सांगतानाचे त्याकाळचे काही व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. शोधून शोधून पाहिले. एक थोर तत्ववेत्ता मराठीत बोलतोय आणि त्यांचे ते असाधारण शब्द समजून घेऊन ते भांडार जगापुढे आणण्यासाठी कुणीतरी विदेशी माणूस जीवाचा आटापिटा करतोय, हे दृश्य एक मराठी भाषिक म्हणून अतीव सुखाचं वाटतं. (ईगो सुखावतो म्हटलं तरी हरकत नाही.!)

खाली दोन पुस्तकांचा एकत्रित फोटो टाकलेला आहे. ‘I am that’ हे त्यांचं गाजलेलं इंग्रजी पुस्तक. आणि शेजारी त्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे- ’सुखसंवाद’!

‘I am that’ हे पुस्तक प्रिंटेड/ पीडीएफ/ ऑडिओ स्वरूपात सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. पण हे जे मराठी ‘सुखसंवाद’ पुस्तक आहे, त्याचा तपास लावण्यासाठी पुण्यातली एकूण एक छोटी-मोठी दुकानं पालथी घालून झाली. मिळालं नाही. म्हटलं की जुन्या काळी कधीतरी प्रकाशित झालं असेल आणि नंतर आवृत्त्या निघाल्या नसतील. आता मिळणार नाही, म्हणून नाद सोडून दिला. पण नंतर एकदा असाच दगडूशेठ गणपतीच्या समोरच्या इमारतीत एक चांगला टी स्टॉल आहे, तिथे चहा प्यायला निघालेलो. जाताजाता सहज ‘नेर्लेकर बुक डेपो’ नावाच्या एका धार्मिक साहित्य विकणाऱ्या पुस्तकाच्या दुकानात सहज नजर टाकली तर थेट समोरच शेल्फवर ‘सुखसंवाद’ दिसलं. छातीच्या डाव्या भागात रक्ताची छोटीशी उसळी वगैरे. लगेच घेऊन टाकलं. एखादं पुस्तक बघून एखादा ग्राहक एवढा कसा एक्साईट होऊ शकतो, हे त्या दुकानदाराला कळलं नसल्यास तो त्याचा दोष म्हणता येणार नाही.

तर ‘सुखसंवाद’. ६६४ पानांचं पुस्तक. आता कुणाला वाटेल की भावनेच्या भरात वाहवत जाऊन ‘मी नुकतंच कित्ती कित्ती भारी पुस्तक वाचलं’ याची दवंडी पिटायला आलो आहे. तर तसं काही नाही. या पुस्तकाबद्दल खरंतर मला काही बोलायचंच नाही आहे. त्याबद्दल एक शब्दही बोलण्याचा माझा आवाका नाही‌. अधिकारही नाही. आणि हे खरंच आहे म्हणजे.

जवळपास तीन-साडेतीन महिन्यांपासून मी ते वाचतो आहे. जरूर पडल्यास असावं म्हणून ते नेहमी जवळपास असेल याची काळजी घेतो आहे. आयुष्य आपापलं भलंबुरं चाललेलंच असतं. इतरही काय काय चाललेलं असतं. त्यातून अधूनमधून हे पुस्तक उचलतो. कुठलंही एखादं पान उघडून आत शिरतो. दोन-चार पानं वाचून झाली की विरघळतो. आणि वेगळाच कुणीतरी होऊन बाहेर पडतो. एखाद्या व्यक्तीच्या आतून कुठल्याही प्रश्नासाठी एवढ्या खोलवरची उत्तरं उमटू शकतात.! जगाकडे एवढ्या वेगळ्या पद्धतीनं पाहता येऊ शकतं.! आश्चर्य आहे !

अध्यात्मिक विषयावर इतकं विलक्षण, इतकं स्पष्ट, इतक्या अधिकारवाणीनं तरीही इतक्या विनम्रपणे क्वचितच कुणी बोललं असेल, असं वाटतं. आता उगाच सतत अधिकाधिक वाचत राहण्याचं कंपल्शन, वाचनाची वसवस करत राहण्याची काही गरज नाही, असं वाटतं. आयुष्यभर वाचत-घोळवत रहायचं म्हटलं तरी हे एकच पुस्तक पुरून उरण्यासारखं आहे. वाचावं, पुरवून पुरवून रवंथ करावा, संपलं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी ! 



Wednesday, 23 July 2025

'द गर्ल ऑन द ट्रेन’- पॉला हॉकिन्स (अनु. उल्का राऊत) : पुस्तक अभिप्राय

ही एक अतिशय नजाकतीने रचलेली सायकॉलॉजिकल थ्रिलर कादंबरी आहे. लेखिकेला थ्रिलर कादंबरीच्या आडून एक उत्तम साहित्यकृती कशी लिहायची हे माहित आहे, असं दिसतं. अतिशय सुपरफास्ट, चित्तवेधक, जागेवरून हलू न देणारं कथन. वास्तववादी, समकालीन, आणि डार्क ह्युमरचा मुक्त वापर. सोप्या सोप्या वाक्यांमध्ये अर्थांचे/ भावनांचे बरेच थर. ही काही वैशिष्टयं.

घटनांची एकच साखळी तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या अँगलनं सांगितलेलीय. सगळ्यात लक्षणीय आहे- रॅचेल हे मुख्य स्त्री पात्र. भयाण एकाकी आणि बेफाम मद्यपी रॅचेल. तिची मद्यधुंद अवस्थेतली बडबड, हतबलता, तडफड, वेडेपणा चितारताना लेखिकेनं व्यसनाबद्दल फार गहन सत्यं उजेडात आणली आहेत. जे कुणी अल्कोहोलच्या व्यसनाच्या ससेहोलपटीतून गेलेले असतील, त्यांना हे फारच रिलेटेबल आहे. एखाद्या पात्राबद्दल वाचकाला एकाचवेळी निराशा, दया, तिरस्कार, हसू अशा टोकाच्या विरोधी भावनांची रोलर कोस्टर राईड अनुभवायला देणं, ही अवघड गोष्ट लेखिकेनं यात साध्य केलेली आहे. थोडीशी अतिशयोक्ती करायची मोहलत घ्यायची म्हटलं तर ही लेखिका म्हणजे दोस्तोव्हस्कीचं 'इंटरेस्टिंग' व्हर्जन वाटली. आवडली.



(चित्रस्त्रोत: google.com)

'सोनेरी स्वप्न' - विस्डम मास्टर म्याटिसिंटीन (अनु-राजेन्द्र कुलकर्णी) :पुस्तक अभिप्राय

तिबेटमध्ये बाराव्या शतकात मिलारेपा म्हणून एक अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले. हे पुस्तक म्हणजे त्यांचा अध्यात्मिक जीवनप्रवास आहे. मिलारेपा आणि त्यांचे गुरू मारपा, यांच्यातील हृद्य नात्याची ही कहाणी आहे. गुरू-शिष्याची जोडी एकदम परफेक्ट आहे. ही कहाणी मिलारेपा यांनी स्वतः सांगितलेली आहे. स्वतःबद्दल, स्वतःच्या गुरूबद्दल एवढं खरंखरं बोलणं, हे इतरत्र कुठं आढळणार नाही कदाचित. क्वचितच एखाद्या शिष्याला असा गुरू लाभला असेल, आणि क्वचितच एखाद्या गुरूला असा शिष्य भेटला असेल, असं वाटतं.

सूडाच्या भावनेतून काही अपकृत्यं करून बसलेला तरुण साधक मिलारेपा, पश्चातापदग्ध होऊन मारपा यांच्याकडे येतो. तो तसा येईपर्यंत मारपा शांतपणे वाट बघत राहतात आणि एकदा तो पट्टीत आल्यानंतर मग त्याला त्यांच्या खास स्टाईलनं, आडमार्गानं मार्ग दाखवत राहतात. वरकरणी त्यांची स्टाईल सुनेला छळणाऱ्या खाष्ट सासूसारखी भासली तरी आतून हा माणूस बुद्धपुरुष असल्याचे जाणवत राहते. साधी सोपी ह्रदयाला स्पर्श करणारी भाषा, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. माणसाच्या मनाबद्दल, मनातल्या विचारांबद्दल एक खोल अंतर्दृष्टी देणारं हे पुस्तक आहे. याचं केवळ वाचन हासुद्धा मन शांत करणारा अनुभव असू शकतो.


(चित्रस्त्रोत: google.com)


Friday, 18 July 2025

'ॲन आयलंड' - कॅरन जेनिंग्ज (अनु. संकेत लाड) : पुस्तक अभिप्राय


ही एक गुंतागुंतीची कादंबरी आहे. एका अज्ञात आफ्रिकन देशात या कादंबरीचं कथानक घडतं. यात सॅम्युअल म्हणून एक मुख्य पात्र आहे. त्याच्या आयुष्यातील चार दिवसांचं हे वर्णन आहे. देशातील हुकूमशहाविरुद्ध बंडखोर चळवळीत भाग घेतल्यामुळे त्याने फार मोठी किंमत मोजलेली आहे. तारुण्याचा प्रदीर्घ काळ छळ, तुरुंगवास भोगलेला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर आता वृध्दावस्थेत तो एका निर्जन बेटावर दीपगृह रक्षक म्हणून काम करत असतो. एके दिवशी त्या बेटावर एक परदेशी निर्वासित वाहत येतो. त्या हृदयस्पर्शी प्रसंगापासून ही कादंबरी सुरू होते. पण त्यानंतर मात्र हळूहळू एका भयाण तणावपूर्ण मनोदशेत ओढून घेऊन जाते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त तणाव, म्हणजे अगदी भीती वाटेल असा तणाव निर्माण केलेला आहे लेखिकेनं.

सॅम्युअलच्या भूतकाळाचा आठवणींद्वारे,फ्लॅशबॅकद्वारे हळूहळू उलगडा व्हायला लागतो. राजकीय दडपशाही, तुरुंगवास, भ्याडपणा, हिंसाचार, दुःख, संताप यांच्या दीर्घकाळ झालेल्या आघातामुळे सॅम्युअलच्या मनावर झालेला परिणाम.. आणि त्यामुळे पॅरानॉईड झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाचं विचलित करणारं चित्रण. शिवाय फॅसिझम, वंशवाद, निर्वसन, 'आपण विरुद्ध ते' असा विषारी संघर्ष, यांसारख्या सध्याच्या ज्वलंत समस्या लेखिकेनं अचूकपणे हाताळल्या आहेत.

एका ओळीत सांगायचं तर ही कादंबरी म्हणजे दुःख आहे. प्युअर दुःख. अविरत झरणारं दुःख. आनंद, प्रेम नावालाही नाही. ही शोकांतिका आहे, जिचा शेवट अगदीच धक्कादायक आहे. कुणी अजिबातच कल्पना करणार नाही, असा शेवट आहे. इतकं पॉवरफुल लिखाण आणि इतका परिणामकारक शेवट. हे असं क्वचितच सापडतं.


'महातीर्थाचा अखेरचा यात्रिक' - बिमल डे (अनु. विजय शिंदे): पुस्तक अभिप्राय


१९५०च्या दशकात चीनने तिबेटचा कब्जा घेतला. भारतातून दरवर्षी अनेक यात्रेकरू तिबेटमार्गे कैलास-मानसला पायी पायी जायचे. हा पारंपरिक मार्ग चीनने परदेशी नागरिकांसाठी बंद केला. ठिकठिकाणी चिनी सैनिकांचे कडक चौकी पहारे बसले. त्या काळात, चिनी सैनिकांपासून बचाव करत लेखकाने सदर मार्गावरून प्रवास केला. त्याअर्थाने लेखक त्या मार्गावरचे 'अखेरचा प्रवासी' आहेत.

(आपल्याकडचे धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन तिबेटला गेले होते, पण ते फार आधी.! सांकृत्यायन यांच्या 'मेरी तिब्बत यात्रा', कोसंबी यांच्या 'निवेदन' या पुस्तकांतून तात्कालीन तिबेटसंबंधी सुंदर वर्णन आहे. या दोघांनी मोठ्या कष्टानं तिबेटमधून बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन ग्रंथसंपदा, दुर्मिळ हस्तलिखितं मिळवून भारतात आणली आणि नंतर ते भांडार जगासाठी खुलं झालं. असो.)

तर या प्रवासादरम्यान लेखक बिमल डे यांनी लिहिलेली डायरी म्हणजे हे पुस्तक. लेखक मूळचे कलकत्त्याचे. शाळकरी वयात घरातून पळून गेले. काही काळ अशीच मनातील उमाळ्यांवर बेतलेली भटकंती करत राहिले. मग एके ठिकाणी त्यांना एक 'गुरुजी' भेटले. पुस्तकात वर्णन केल्यावरून हे गुरुजी म्हणजे एक पितृतुल्य, परिपक्व, आदरणीय माणूस असावेत, असं वाटतं. तर हा पोरसवदा लेखक त्या गुरुजींसोबत एका नेपाळी यात्रेकरूंच्या जथ्थ्यांत सामील झाला आणि तिबेटला गेला. जवळ कसलेही रिसोर्स नसताना निव्वळ भगवान-भरोसे केलेला हा प्रवास आहे. लेखकानं आपल्या या पुस्तकाचं वर्णन 'एका भिकाऱ्याची डायरी' असं केलेलं आहे. परंतु ते तसं अजिबातच नाही आहे. एक वेगळ्याच प्रकारची श्रीमंती, आंतरिक समृद्धी या संबंध पुस्तकात ठायी ठायी अनुभवास येते. तिबेटच्या अगदी अंतर्भागातील लोकजीवन, त्यांचं आदरातिथ्य, मानवी स्वभावांचे नमुने, त्या प्रदेशाचं अत्यंत उत्कट असं निसर्गवर्णन, प्रवासात भेटलेल्या बौद्ध लामांचे अनोखे अनुभव वाचायला मिळतात. 'असंच उठून सगळं सोडून तिबेटला जावं' असं वाटायला लावण्याजोगं एक सुंदर प्रवासवर्णन/ जीवनवर्णन झालेलं आहे हे.


चित्रस्त्रोत: google.com

Sunday, 4 May 2025

'सिंधुतील साम्राज्ये'- पुस्तक परिचय

सिंधू नदीची एक अद्भुत बायोग्राफी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. सिंधुकाठी बहरलेल्या अनेकानेक लोकसंस्कृत्यांचा मनोज्ञ धांडोळा या पुस्तकात आहे. कराचीतील सिंधूच्या मुखापासून ते तिबेटमधील उगमापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास (आणि घनघोर रिसर्च) करून या लेखिकेनं हे पुस्तक लिहिलं आहे.
सिंधूच्या काठाकाठानं, तसेच तिच्या उपनद्यांच्या अंतर्भागातून आडवातिडवा प्रवास करत लेखिकेनं आपल्यासमोर स्थलकालाचा एक भव्य भरजरी पट उलगडलेला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, चीन आणि तिबेट अशा देशांमध्ये पसरलेल्या सिंधू नदीची ही चित्तवेधक कहाणी आहे. या महाकाव्यामध्ये हरवून जायला होतं.

या लेखिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती चांगलं लिहिते. हिची कथनाची शैली अनोखी आहे. भाषेवर हिची घनघोर पकड आहे. या पुस्तकात काही ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांची न रूचणारी सत्यं सांगताना लेखिकेची खुसखुशीत विनोदबुद्धी चांगलीच उपयोगी पडते.

या प्रवासात लेखिकेनं लोकसंस्कृत्या, त्यांचे गुणावगुण, इतिहास, पुरातत्व-वारसा स्थळे, भूगोल, वास्तुकला, पर्यावरण, राजकीय परिस्थिती, अशा विविध अंगांना खोलवर स्पर्श केल्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचनाचा महामूर आनंद मिळतो. प्रत्येक ठिकाणच्या लोकजीवनांचं, त्यांच्या चालीरीतींचं रोचक वर्णन यात आढळतं. 

सिंधूच्या काठावर वसलेल्या हडप्पा- मोहेंजोदारो, बौद्ध स्तूप, लेणी, मंदिरे, दर्गे, गुरूद्वारे हे सर्व यात अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलं आहे की त्यामुळे लगेहात यूट्यूबवर त्या स्थळांचे व्हिडीओ शोधून बघण्याचा मोह आवरता येत नाही.‌ शिवाय सिंधुकाठावर हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि शीख ह्या धर्मांचं संश्लेषण आणि त्यांनी एकमेकांवर टाकलेले प्रभाव.! हे वाचताना आपण कधी वेदकाळात, कधी बौध्द काळात, कधी सूफी फकीरांच्या बहराच्या काळात, कधी सिकंदराच्या तर कधी ब्रिटिशांच्या काळात, तर कधी गुरू नानकांच्या काळात जाऊन पोचतो. आपला पतंग असा इतिहासावकाशात उडवता उडवता लेखिका मध्ये मध्ये अचानक दोराला हलका झटका देऊन वर्तमानात परत आणते. स्थलकालात असं विनायास मागे-पुढे विहरण्याची तिची पद्धत भलतीच रोचक आहे.

लेखिका सिंधू खोऱ्यातील अशा अशा अनघड ठिकाणी पाय तुडवत गेलेली आहे की आपण तिथे जाण्याची फक्त कल्पनाच करू शकतो.! विशेषतः आदिवासी दुर्गम पहाडी प्रदेशांमधले प्रवास, (आणि तेथली दिलखुलास आदरातिथ्यं), अफगाणिस्तान- तालिबान-स्वात खोऱ्यांतून बेकायदेशीर सीमा ओलांडून केलेले जीवावर बेततील असे प्रवास हिने कुठल्या अतूट विश्वासाच्या बळावर केले असतील, कळत नाही.!

साधारण साडेतीनशे पानांचं पुस्तक असून यात बारा प्रकरणं आहेत. 'सिंधुकाठचे संत' आणि 'रेशीम मार्गावरचा बुद्ध' ही प्रकरणं फारच जास्त भावली.

'विलुप्त होत चाललेली नदी' या शेवटच्या प्रकरणातून सांगितलेला, लाखो वर्षांपासून करोडो लोकांना जीवन देत वाहत आलेल्या सिंधू नदीचा अलीकडे होत असलेला पर्यावरणीय नाश मात्र प्रचंड अस्वस्थ करत राहतो. कोण कुठली ॲलिस अल्बिनिया लंडनवरून येऊन एवढं आपलेपणानं लिहिते सिंधुबद्दल आणि आपण असे की.. असो.




Thursday, 24 April 2025

बी ॲज यू आर - पुस्तक परिचय

रमण महर्षी हे अलीकडच्या काळातील एक एनलाईटन्ड मनुष्य होते. हे या पुस्तकातून झळकतंच म्हणजे. यामध्ये प्रश्नोत्तरे आहेत. त्यांच्याकडे लोक यायचे, प्रश्न विचारायचे, समस्या सांगायचे. त्याअनुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरं आहेत. समोरच्या मनुष्यानं ज्या पातळीवरून प्रश्न विचारला आहे, त्या पातळीवर पोहचून उत्तरं दिलेली आहेत. म्हटलं तर खूप डीप फिलॉसॉफीकल डिस्कशन्स आहेत, म्हटलं तर अगदी साधे सरळ सोपे संवाद आहेत.

त्यांची ही उत्तरं/चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकाळी लिहून ठेवलेली, त्यांचं कलेक्शन नंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झालं. (मराठीत नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं 'रमण महर्षी', तसेच प्रज्ञा सुखटणकर यांनी मराठीत भाषांतरित केलेली काही पुस्तकं आहेत.) पण हे "बी ॲज यू आर" हे इंग्रजी पुस्तक फारच चांगलं आहे. डेव्हिड गॉडमन या त्यांच्या शिष्याचे प्रचंड कष्ट यापाठीमागे आहेत. या पुस्तकाबाबत असं म्हणायचा मोह होतो की हे वाचलं तर स्पिरीच्युॲलिटीसंबंधी इतर कुठल्या पुस्तकाची आवश्यकताच वाटत नाही.

विचारले गेलेले प्रश्न क्वालिटीचे आहेत. त्यावर महर्षींची उत्तरं 'हटके' आहेत.‌ ही उत्तरं अवाक् करतात. मौन करतात. म्हणजे शब्दांची अर्थवहनातील मर्यादा लक्षात घेता, जे शब्दांच्या सहाय्याने जे सांगणं अशक्य आहे, तेही पोचवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात.

ते उपदेश मोड टाळून मनाचं जंजाळ नेमकं कसं काम करतं, हे उलगडून दाखवण्यावर भर देतात. काही वेळा ते प्रश्नकर्त्यालाच एखादा मार्मिक (रामबाण) प्रश्न विचारतात आणि त्याला जोडून हळूहळू उपप्रश्नांची लड लावतात. त्या प्रश्नांचा मागोवा घेत जाण्यातून प्रश्नकर्त्याला स्वतःलाच उत्तरापर्यंत जाण्याचं सुचवतात. 'मी कुणीतरी गुरू बसलोय इथे, आणि आता तुम्ही माझं मुकाट ऐका' असला आविर्भाव त्यांच्याठायी कणभरही जाणवत नाही.

त्यांचा असा कुठलाही ध्यानविधी वगैरे नाही. त्यांच्या एकूण शिकवणुकीचा गाभा म्हटला तर 'सेल्फ एन्क्वायरी' किंवा 'आत्म-विचारणा' हा आहे. म्हणजे मनाला सतत प्रश्न विचारा. धांडोळा घ्या. प्रश्न, त्यामागे आणखी एक प्रश्न, त्यापाठीमागे पुन्हा आणखी एक प्रश्न असं करत करत मागे मागे इन्फिनिटी पर्यंत.! या प्रक्रियेत मन संभ्रमात पडतं. अवचित गळून पडतं. विलीन होतं.

हे म्हणजे मनाचा वापर करून मनाला निर्विचार करणं.‌ मनाचा वापर करून मनाचा अंत घडवून आणणं. आणि हे सगळं तर्काच्या आधारे.! कुठंही 'हे माना' 'ते माना' 'यावर विश्वास ठेवा', 'त्यावर श्रद्धा ठेवा', 'अमुक शास्त्र असं असं सांगतं', 'तमुक ज्ञानी असं असं म्हणतो' वगैरे काही नाही. किंवा उगीच उदाहरणं/कथा-किस्से सांगून पाल्हाळ लावणं नाही. ते थेट मुद्द्यालाच हात घालतात आणि शेवटपर्यंत धरून ठेवतात. तर असा हा शुद्ध ज्ञानमार्ग. स्वतःच स्वतःला विचारून बघा आणि जाणा. 



[रमण महर्षींसंबंधी थोडी अधिकची माहिती :

देहावसान (१९५०) होईपर्यंत ते तमिळनाडूमधील अरूणाचल पर्वत परिसरात राहत होते. ते स्थळ रमणाश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची राहणी अतिशय साधी सहज होती. आणि चेहऱ्यावर निर्मळ हासू. चांगलेपणाची बरसात करणारं.!

आयुष्यभर सर्ववेळ ते तिथे आश्रमात एका हॉलमध्ये बसून राहत. देशविदेशातून अध्यात्मिक जिज्ञासूंचा ओघ चालू असे. कुणीही यावं, बसावं. बोलायचं असेल तर बोलावं, काही विचारायचं असेल तर विचारावं. बोलायचं नसेल तर मौन बसावं. त्यांच्यापुढं सगळ्यांना मुक्त प्रवेश असे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना ॲक्सेसिबल राहिले. सगळ्यांशी सारख्याच आत्मीयतेने बोलत राहिले.‌ व्हीआयपी/ सर्वसामान्य/गरीब/पैसेवाला/ प्रापंचिक/ साधक/ लहान मुलं/ जात-धर्म असला काही भेदभाव नाही. त्यांनी आजकालच्या काहीजणांसारखा स्पिरीच्युॲलिटीचा बाजार केला नाही. कर्मकांड, धार्मिक अवडंबर, चमकोगिरी, हारतुरे, बुवाबाजी, चमत्कार वगैरे काही नाही. ]

'आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’ -- पुस्तक अभिप्राय

असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे ...