'कुब्र' म्हणजे निबिड, अनाघ्रात अरण्य. हे पुस्तक अशा अरण्याचं आहे. काळवेळाचे साखळदंड विसरून, दीर्घ काळ अरण्यात राहून, निर्भार रेंगाळून झाल्यावर मनात जे समृद्ध अरण्य कायमचं वस्तीला येतं, हे त्यावर लिहिलेलं पुस्तक आहे.
लेखकाच्या ठायी तत्त्वचिंतक, संशोधक आणि कवी अशा तीन वृत्तींचा दुर्लभ संगम झालेला आहे. जे दिसलं, जे अनुभवलं ते सगळंच्या सगळं टिपता येणं हेच मुळात दुष्कर. आणि पुन्हा ते सगळं जसंच्या तसं इतरांपर्यंत पोहचवणं, हे त्याहून कठीण. त्यासाठी जी जादुई प्रतिभा लागते, ती या लेखकावर मेहेरबान झाली आहे.
या पानांमधून प्रवास करत, आपण त्या कुब्र च्या गाभ्यात, त्या निबिड अरण्यात दाखल होतो, डुबून जातो. हरवतो. लेखकानं टिपलेली अरण्याची घनगंभीर स्पंदनं टिपत राहतो स्तब्ध.
हे काही एका दमात वाचून सुटका करून घेण्यासारखं नाही. श्वासात भिनत जाणारं लिखाण आहे हे. म्हटलं तर फार फार बारकाईनं केलेलं काम आहे. म्हटलं तर व्यासांसारखं महाकाव्य आहे.
यातली कुठलीही नोंद वाचायला घ्यावी, मनाची अवस्था बदलून जाते. जीवनाच्या जाणिवेची संथ अंतर्धारा वाहते ओळींतून. कान देऊन ऐकत रहावी. ओळींतून मन झिरपतं. स्वतःला गाळून घेतं. हिणकस वरती राहतं. निखळ अस्तित्वाचं भान खाली उतरतं. असा हा मग्न, आत्मस्थित ऋषी, अरण्य उपनिषद लिहितो.!!
अफाट पसारा आहे. कसं न्याहाळायचं हे कोडं? कशी आणावी दृष्टी? कुतूहल आहे.!
एकेक घटना घडत आहेत. घटना सुट्या सुट्या नाहीत. त्यामागे एकसलग जैवसाखळी आहे. कार्यकारण भाव आहे. स्वतःची अशी नैसर्गिक लय आहे. मृतदेहांचं विघटन होतंय. मगरीकडून सावज टिपलं जातंय. अजगर चितळ गिळतंय. रानकुत्र्यांची झुंड हरणास घेरतेय. एकेक चित्तथरारक नाट्यं.! वाचताना श्वास अडकतोय. एकेक घटना घडत आहेत!
क्रोर्य, करूणा, भय, व्याकुळता, शहाणीव यांची हलती क्षणचित्रं सरकतात डोळ्यांसमोरून. आणि या सर्वांप्रती लेखकाचा विलक्षण साक्षीभाव! यानं स्वतःभोवती अरण्याची दुलई पांघरलेली आहे, अरण्याची लय-कंपनं याच्यात झिरपली आहेत. हा अरण्यात विरघळून गेलाय, स्वतःचं अस्तित्व जाणवू देत नाही. वाचकांनी आपापल्या पंचेद्रियांनी हा अनुपम सोहळा अनुभववावा. याच्या लिहित्या बोटांना अद्भुताचा स्पर्श झालेला आहे.!
अरण्यातलं ऋतूचक्र सूक्ष्म गतीनं बदलताना पाहतोय. ऋतूंचे सांधे बदलताना पाहतोय. त्याचे जीवसृष्टीवर होणारे परिणाम पाहतोय. लय-विलयाचं अनादि अनंत चक्र पाहतोय. हा फक्त पाहतोय. जे जसं घडतंय तसं पाहतोय. त्याला स्वतःची टिप्पणी जोडत नाही. पण एक आख्खी कादंबरी लिहून जे सांगता आलं नसतं, ते जीवनाचं समग्र नाट्य हा फक्त एका नोंदीमध्ये रचतोय. त्या क्षणबिंदूंचं संचित, त्यांचा अर्क आपल्यापुढे ठेवतोय. हा फक्त पाहतोय.!
याचा इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद होणं आवश्यक आहे. हे इतर भाषांमध्ये पोहचणं आवश्यक आहे. कारण हे सगळं फार वैश्विक आहे. अर्थात, ही गूढ अरण्यलिपी वाचण्यासाठी लेखकानं स्वतःची जी धाराप्रवाह आरस्पानी मराठी घडवलेली आहे, तिचा अनुवाद करणं काही सोपं असणार नाही.
No comments:
Post a Comment