१. गुणवंत शाह यांचं 'अस्तित्वाचा उत्सव'.!
हे ईशावास्य उपनिषदावर आहे. म्हणजे त्यातला एकेक श्लोक चिंतनासाठी घेऊन लाईफटाईम रिलॅक्सिंग मैफिल रंगवलेली आहे. रजनीशांनीही ईशोपनिषदावर प्रवचनं दिलेलीयत पूर्वी, पण हा आशय त्याहून उजवा वाटतो.
प्रदीर्घ डिप्रेशन, सिनीसीझम, ठराविक काळाने येणारं सेल्फ डिस्ट्रक्टींग विचारांचं आवर्तन, पराकोटीची व्याकुळता, परात्मभाव, विलगता, मिनींगलेसनेस, नथिंगनेस अशा जीवन-अवस्थांसाठी हे चांगलं आहे.
'टू बी ऑर नॉट टू बी?'. 'आता काय करू?'. एकच सवाल आहे. एकच रोकडा सवाल आहे. आता पळायला जागा नाही. आत्ता या क्षणी या क्षणाचा सामना करावाच लागणार आहे. काहीतरी तड लावावीच लागणार आहे. हा प्रश्न आता पुढे ढकलता येण्यासारखा नाही. तो ऑप्शनच नाही. हे कसं हॅंडल करणार ? कळत नाही.! 'सिदन्ति मम गात्राणि' म्हणत हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनासारखी स्थिती !
भयाण रिकामपण घेऊन वेळा येतात. सगळं आतल्या आत थिजून बसतं. आता करू तर काय करू ? आणि कशासाठी करू? सगळं डवांडोल.! इंटरेस्टच खतम.
कसलीही हालचाल करू म्हटलं तरी अर्थ दिसत नाही. मन एकेक करून सगळ्यालाच नकार द्यायला लागतं. एक काळोखी गर्त भयकातर. अथाह पोकळी. नथिंगनेस जडशीळ आकार ऊकार नसलेला. कसं हॅंडल करायचं ?
अशा वेळांसाठी हे पुस्तक औषधी आहे. काही नाही. उघडून फक्त एक-दोन पानं डोळ्यांपुढून सरकू द्यायची. मनाची अवस्था आधीसारखी राहत नाही. जीवेषणा परतून येते. एक रिलीफ, एक ट्रॅंक्विलीटी.! आह्!
पण हे पुरवून पुरवून वापरायचं आहे. थोडं थोडं चमचा चमच्यानं एकेक घोट. एकेक पान वाचून, मुरवून, त्याच्या अर्थाचा जगण्यात शोध. वाचता वाचता थोडं थोडं मन सुटतं. मौन उतरतं. यावर हात ठेवून ध्यान करावं, वाटतं. करावं. हे पुस्तकच सखोल ध्यानातून, चिंतनातून आलेलं असावं.
२. आयन रॅंडची ॲटलास श्रग्ग्ड आणि फाऊंटनहेड ही दोन पुस्तकं ऐन तारुण्यात वाचली की माणूस भारावून जातो. दहा वर्षांपूर्वी भेटेल त्याला ही रिकमेंड करत होतो.
आजकाल आणखी एकदा चाळतो. पुस्तकं तीच, मजकूर तोच. मधल्या काळात खाजगीकरणाचे फटके खात शोषित झालेलो, त्यामुळे आधीचं भारावून जाणं वजा झालं. आता तिच्या युक्तिवादातल्या कमजोर जागा लक्षात येतात. मॅडम ज्या आदर्श भांडवलशाही व्यवस्थेचं तत्वज्ञान मांडतायत, ते फक्त फॅंटसीतच शक्य आहे.
ही पुस्तकं १९४०-५० च्या दशकात लिहिली गेलीयत. तो काळ कम्युनिझमच्या जोराचा होता. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मॅडमनी हे ऑब्जेक्टिव्हिजम चं तत्वज्ञान मांडलं. व्यक्तीवाद.! मी, माझं, माझ्यापुरतं.! आणि तसं जगण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था ही आदर्श व्यवस्था.! तिच्या उदात्तीकरणासाठी मॅडमनी मस्त लेखणी झिजवलेली आहे. टोलेजंग बॅटिंग केलेली आहे.
आता कम्युनिझमचा काळ कधीच मागे पडलेलाय. कम्युनिस्ट त्यांच्या मरणानं मरून गेलेत. पण तरीही लेखिकेच्या कादंबऱ्यांत कल्पिलेले प्रतिभावंत उद्योजक कुठे प्रकट झालेले दिसत नाहीत. आजकालचे जे बिग जायंट उद्योजक म्हणवतात, ते माफिया/कार्टेल च आहेत. यांना कसली फिलॉसॉफी न् कसलं काय? हे भामटेच आहेत सरळसरळ.
तर आता लेखिकेच्या पल्लेदार भाषेचा फुलोरा बाजूला सारून नीट बघितलं तर उरतात तिचे ते सुपरमॅन नायक-नायिका.!!हार्वर्ड रॉर्क, डॉमिनिक फ्रॅंकन, गेल वायनांड, फ्रॅंको डॅंकोनिया, डॅग्नी टॅगार्ट, हॅंक रिअर्डन वगैरे.! आणि त्यांचे लांबलचक मोनोलॉग्ज, डायलॉग्ज..! ते वाचा, दूरूनच रामराम करा आणि विसरून जा.! हिचा ॲटिट्यूड आता डोक्यात जायला लागला आहे.
बाकी, लेखिकेने सोशल सिक्युरिटी किंवा आर्थिक दुर्बलांना व्यवस्थेकडून दिली जाणारी मदत वगैरे गोष्टींना आयुष्यभर विरोध केला. कारण आर्थिक दुर्बल म्हणजे मिडिऑकर.! सर्वसामान्य. ॲव्हरेज जनता पब्लिक.! तर अशांविषयी खास अमेरिकन तुच्छताभाव किंवा परात्मभाव.! आणि मॅडमवर स्वतःवर म्हातारपणात वेळ आली तेव्हा सगळे सोशल सिक्युरिटीचे, मेडिकेअर वगैरेचे लाभ मिळवले. स्वतःचं तत्वज्ञान स्वतः तरी पाळायला पाहिजे होतं. असो. तर हेच साठाव्या वर्षी वाचलं तर कदाचित अजून टाकाऊ वाटायला लागेल. बघूया.
३. राहुल सांकृत्यायन यांचं 'घुमक्कड-शास्त्र'. हे भटकंती बद्दलचं, भटकंतीची जी आदिम मानवी प्रेरणा असते, त्या प्रेरणेचं आहे. हे पुस्तक भटकंतीचं तत्वज्ञान उभं करतं. भटकंतीला एक पवित्र गोष्ट मानतं. आयुष्यभर पत्करलेला धर्म, साधना किंवा व्रत मानतं.
जातिवंत पॅशनेट भटक्या लोकांनी वाचावं. कुणीतरी समानधर्मी भेटल्यावर मन जसं प्रसन्न होतं, तसं होईल. सुरसुरी येईल. भटकंतीकडे निव्वळ टाईमपासच्या पलीकडे जाऊन बघता येईल. त्यातून एक मनोभूमिका निश्चित होईल. या वाटेवर सोबतीला एक तत्वज्ञ-गुरू म्हणून हा लेखक, तसेच आजवरचे अनेक थोर देशी विदेशी अस्सल भटके आपल्यासोबत आहेत, याबद्दल कृतज्ञता वाटेल.
लेखकानं चाळीस वर्षांच्या भटकंतीच्या अनुभवांचा अर्क या १६० पानांच्या पुस्तकात उतरवला आहे. वेगवेगळी प्रकरणं आहेत. उदाहरणार्थ अथातो घुमक्कड जिज्ञासा, जंजाल तोडो, वय, स्वावलंबन, कला, घुमक्कड-धर्म, प्रेम, देशज्ञान, मृत्यूदर्शन, लेखन, निरूद्देश, आठवणी इत्यादी. अशा वेगवेगळ्या अंगांनी 'भटकंती-शास्त्राचा' वेध घेतला आहे. पुढे मागे ऑक्सफर्ड केंब्रिज वगैरेमध्ये भटकंती-शास्त्राचा एखादा कोर्स निघाला तर हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून लावलं जाईल, असा आबाद आशय आहे. मोठं काम आहे.
पहिल्या दर्जाचा 'परिपूर्ण' भटक्या होण्याचे लेखकाचे निकष कठोर, पण मजेशीर आहेत. ते रक्तातच असावं लागतं. भटकंतीचं बीज कुठंतरी आतच असावं लागतं वगैरे. तर लेखकाच्या शास्त्रानुसार पहिल्या दर्जाचा भटक्या होणं कठीणे. आपण कदाचित आठव्या नवव्या दर्जाचा भटक्या होऊ शकू.
पुस्तक माझ्या दुप्पट आयुष्य जगलेलं आहे. जवळपास पंचाहत्तर वर्षांचा टाईम ट्रॅव्हल करून हातात आलंय. ही प्रत देश स्वतंत्र झाला त्या आसपासची आहे. तारखेवर हात फिरवतो, तेव्हा थरारल्यासारखं होतं. तेव्हा नवंकोरं असलेलं हे पुस्तक आज वयोवृद्ध झालंय, पण चांगल्या साहित्याला काही कालमर्यादा नसते. भटकंतीतून मिळणाऱ्या आनंदाची फारशी कल्पना नाही, पण हे वाचताना मिळालेलं सुख मात्र अनुपम होतं.
४. काश्मीरबद्दल भरपूर लिहिलं गेलंय. प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात. त्याप्रमाणे आपापल्या सोयीचे निष्कर्ष काढून मोकळे होतात. पण मानव कौल यांची 'रूह' खरोखरंच चांगली कादंबरी आहे. व्यक्तिगत आहे. स्वतःवरचं भूतकाळाचं ओझं उतरवण्याची असोशी आहे. मानव कौल काश्मिरी पंडित आहेत. लहानपणी स्थलांतरित व्हावं लागलं, मग आयडेंटिटी क्रायसिस दीर्घकाळ. त्यातून मग ते तिथे परतून गेले, फिरले, राहिले काही काळ आणि लिहिलं.
यातून काश्मीरचा गंध, काश्मीरियतचा आत्मा स्पर्शिण्याचा प्रयत्न केलाय. आठवणी हृद्य आहेत. माणसानं माणसासाठी लिहावं, हा लेखकाचा धर्म ते सोडत नाहीत. कौल फारच नाजूक तरीही स्थिर हातांनी लिहितात. अवघड सत्यंही हळूवारपणे आणि कल्पकतेनं सांगितली तर अंगावर येत नाहीत, हे त्यांना माहितीय. निर्बुद्ध झुंडींच्या युगात असंही लिहिणारा एकजण आहे, हे आश्वासक आहे.
विनय हर्डीकरांचं 'व्यक्ती आणि व्याप्ती'.! यातले म. द. हातकणंगलेकर, गोविंद तळवलकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यावरचे लेख अप्रतिम. पर्सनल टच असलेली, संतुलित, बहारदार आणि गोळीबंद व्यक्तिचित्रणं. व्यक्तीचित्रणं लिहावीत तर अशी. हर्डीकर आवडले आपल्याला.!
५. सरिता आवाड यांचं 'हमरस्ता नाकारताना' हातातून सोडवत नाही. फार च चांगलं आत्मचरित्र.! लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतीचित्रे'चं मराठी साहित्यात जे स्थान आहे, हे त्याच दर्जाला जाणारं काम आहे.
आईशी, म्हणजे सुमती देवस्थळेंशी, लव्ह-हेट रिलेशनशिप. पीळ दोघींचा खास. आईबापाविषयी, सगळ्यांविषयीच असं माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. समजूतदार, ठाम आत्मविश्वासपूर्ण लिखाण. हा काळाचा दस्तऐवज. सोपी सरळ वाक्यं. पण वाचताना वेगवेगळ्या भावना उमटतात. लेखिकेला चांगलं जगता आलंय. स्वतः जी वाट निवडली, त्यावर चालताना जे भलं बुरं समोर आलं ते सोसताना लेखिका कमी पडलेली नाही. साठाव्या वर्षी लिहिलंय, त्यामुळे एवढी प्रगल्भता आली असावी. वाचून झाल्यावर छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटतंय. लेखिकेने हे लिहून स्वतःचं ओझं कमी केलेलं दिसतंय. ते ओझं आता आपल्यावर आलं.!
व. दि. कुलकर्णींचं 'ज्ञानेश्वरी: एक अपूर्व शांतिकथा'! वदि ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पार बुडालेले आहेत. ओव्या आणि त्यातली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवताना किती बोलू आणि काय बोलू, असं झालंय यांना.! माणसानं प्रेयसीबद्दल बोलावं तसं हे ज्ञानेश्वरी बद्दल बोलतायत. हे म्हणजे हाडाचा शिक्षक आहेत. माठातल्या माठ माणसालाही हे ज्ञानेश्वरीची जादू दाखविल्याशिवाय सोडायचे नाहीत. भारी!!
६. दिलीप माजगावकरांचा 'पत्र आणि मैत्र' पत्र-संग्रह. यात त्यांनी लेखकांना पाठवलेली पत्रं आहेत. माजगावकर एवढं सही लिहितात, माहित नव्हतं. कदाचित ते फक्त राजहंसच्या आतल्या वर्तुळातच माहिती असणार. एवढी वर्षें हा माणूस पडद्यामागं राहून कसल्या कसल्या खिंडी लढवत होता, जेणेकरून चांगली पुस्तकं लोकांपर्यंत यावीत.! चित्रकार सतीश देशपांडेंच्या मुलाला त्यांनी पाठवलेलं पत्र, अस्सल सोनं आहे म्हणजे. विचारसरण्यांवरच्या त्यांच्या कमेंट्स, निरीक्षणं फ्रेश आहेत. चांगली स्वच्छ संपादकीय दृष्टी लाभलीय त्यांना !!
एकूण माजगावकर आदरास पात्र आहेत.! बाकी, सारंग दर्शने समजा संघाचे असले तरी प्रस्तावना चांगली लिहिलीय. आवडली. आणि अंबरिश मिश्रचा लेखही!
७. आनंद करंदीकरांचं 'वैचारिक घुसळण'! एकेक इश्यू, प्रश्न विचारार्थ घेतात आणि तो अनेक अंगांनी निरखून पाहतात. जाम रिसर्च करून लिहितात. चिरेबंदी काम. लिहिण्याचे विषय विपुल रेंजचे आहेत. समकालातले आहेत. एखादा लेख कसा लिहावा, विचार कसा करत जावा, याचे डेमो च सापडतात यात.
आणि नर्मविनोद सहज, ओढूनताणून नाही. बुद्धिमत्तेची चमक.
आणि उपहास वक्रोक्ती ओरिजनल.
आता हे लेख वाचल्यावर अभिजीत वैद्य चं 'शब्दांचीच शस्त्रे' वाचवेना. लिटरेचर इन हरी. राजकीय घडामोडींना तात्काळ दिलेला प्रतिसाद! घडामोडी शिळ्या होऊन गेल्यावर हेही होऊन बसतं.
भावार्थ मधून विजय पाडळकरांचं अकिरो कुरासावा वरचं आणि गुलजार च्या सिनेमांवरचं पुस्तकं आणली, चाळून संपवली. खूप जुने सिनेमे आहेत हे. ठिकठाक आहे. राजीव जोशींचा 'धूपघडी' आवडला नाही. खूप लांब पल्ल्याच्या, दीर्घकविता आहेत. धाप लागते. छोट्या छोट्या ठीक. त्यांचा 'दो पंक्तियों के बीच' चांगलाय.
भारत सासणेंचं 'रक्तातल्या समुद्राचं उधाण'. हृद्य पुस्तक. चांगला वेळ गेला वाचताना. गंभीर चिंतनशील अलवार लिखाण. सासणे पात्राचं आयुष्य उभं करतात. उथळ कमेंट्स करत नाहीत. निरीक्षणं जबरी आहेत. त्यात सहानुभाव आहे. हे असं मूलद्रव्य एखाद्याच्या आतच असलं पायजे. इकडून तिकडून उसनं आणता येत नाही.
८. असीम छाब्रा चं इरफान खान वरचं पुस्तक. एक ऐसा कलाकार जिसकी आंखे अफसाना लिखती है. इरफानचे सिनेमे मुलाखती पुन्हा एकदा बघावेत, यात लिहिलेल्या काही जागा कन्फर्म करायला. पुस्तक चांगलंय. लेखक इरफानचा डाय हार्ड फॅन आहे, हे स्पष्टच आहे. पण शब्दसंपदा कमी पडतेय. ‘याला तोड नाही' हा शब्दप्रयोग वारंवार येतोय. बाकी, इरफानवर जेवढं लिहिलं जाईल तेवढं कमीच आहे. त्याच्यावर भाष्य करायचं म्हणजे तितक्याच तोलामोलाचा कुणीतरी लेखक पाहिजे.
असेच आपल्याकडे गिरीश पांडुरंग कुलकर्णी आहेत.! पूर्वी लोकसत्तेत 'बहरहाल' म्हणून एक इंटेन्स सदर लिहायचे. तेवढ्या एका सदरा साठी रविवारी पेपर घ्यायचो. तर त्यांनी जरा आणखी लिहायचं मनावर घेतलं पाहिजे. भाषेचं भलं होईल. शब्दांची निवड फारच अनवट असते त्यांची. बाकी ते म्हणजे सरळसरळ इंटलेक्चुअलच आहेत. एकदम गहिरं पाणी. मुलाखती आहेत यू ट्यूबवर. बोलायला लागले की चिंतनाचा वनसायडेड प्रपात कोसळत राहतो. आपल्या छोट्या तांब्यात किती भरून घेणार! तर, त्यांनाही आणखी चांगले मुलाखतकार मिळायला हवेत. नाहीतर मग सुमार यूट्यूबर्सचा सुळसुळाट आहेच. काही वाचन नाही, काही आकलन नाही, काही गांभीर्य नाही. पुढचा माणूस कुठल्या लेव्हलवरून बोलतोय, आणि आपण त्याला काय विचारावं, याची समज नाही. समजा कधी साक्षात गौतम बुद्ध समोर येऊन बसले, तरी हे 'तुम्हाला कुकींग येतं का?' विचारतील.! हो ना.. नाहीतर काय.! यांना कोण अडवणार ना!
९. फूटपाथवर जुन्या पुस्तकांचा ढिगारा उपसताना हात धूळीनं माखतात. पण यान मार्टेल चं beatrice and Virgil, सापडलं शंभर रूपैला. कोण कुठलं लंडन आणि कुठलं हाईड पार्क.! त्याला तिथं झालेला तो साक्षात्कार इथं बसल्या बसल्या जाणवतो. ही लेखकाची ताकद. या शब्दकळेशी आपण नवखे, तेव्हा जरा काही समजलं की भारी वाटतं. आपलं हे calf love कधी थांबणार.! साला सुरूवात एवढी चांगली केली होती पण नंतर ट्रॅक सुटला, फाफलला यान मार्टेल. मध्येच हे पानंच्या पानं भरून नाटक, फ्लॉबेर, प्राणीसंग्रहालय वगैरे कशासाठी लिहिलंय?
१०. ट्रेवर नोआ चं 'बॉर्न अ क्राईम'. डार्क ह्युमर आहे. चांगलं पुस्तक. चांगला अनुवाद. बारावीतल्या मुलीनं हा मराठी अनुवाद केलाय.! आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय समाजरचेनेचे अंतरंग. झोपडपट्टीतलं अर्थशास्त्र, तुरूंग, डिस्क्रिमिनेशन. लहानपण, भूक. प्रेमप्रकरणं. काळा बाजार. पोलिस. वर्णभेदी टिपण्या. पूर्वग्रहदूषित नजरा. ऐन तारुण्यात या सगळ्याकडे एवढं तटस्थपणे बघायला कसं जमत असेल! हे सगळं झेलत हा विख्यात स्टॅण्ड अप कॉमेडीयन होऊन बसलाय. स्ट्रगल खतरनाक आहे. आपल्या सारख्याला याचं वारंही झेपणार नाही. आपण म्हणतो की फक्त आपल्याकडेच हे क्रूर प्रकार चालतात. नाही, माणसं सगळीकडे सारखीच वेडझवी असतात.
No comments:
Post a Comment