इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत.
परिचय क्र. १ (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) :
तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्तक हातात घ्यायचं जीवावर येत असेल किंवा पुस्तक बघताच अंगावर काटा येत असेल. पण तरीही कधीकधी पुस्तकांबद्दल कुतूहल वाटत असेल, तर खास तुमच्यासाठी हे पुस्तक आहे-- झोरान झिवकोविचचं 'द लायब्ररी'.! अलीकडेच नीतीन रिंढे या व्यासंगी व्यक्तीनं हे मराठीत भाषांतरित केलं आहे.
छोटेखानी पुस्तक आहे, शंभरेक पानांचं. याचा आकार अगदी तळहाताच्या पंजात मावेल एवढा आटोपशीर आहे. यात वाचनासंबंधी सहा छोट्या-छोट्या कथा आहेत, ज्या अद्भुत आणि धमाल आहेत. वाचताना मौज येते. भाषा अगदी सोपी सुंदर सुटसुटीत आहे. नवीन वर्षात वाचनाची सुरूवात करायची असेल तर हे अगदी परफेक्ट पुस्तक आहे.
फक्त एवढंच करावं लागेल की हे पुस्तक मिळवावं लागेल आणि सरळ पहिल्या कथेपासून वाचायला सुरुवात करावी लागेल. बाकीचे सगळे बहाणे बाजूला ठेवून, मनाचा निश्चय करून हे एवढं एक पुस्तक जरी वाचलंत तरी वाचनाची मौज काय असते, याची झलक मिळेल. कळेल की पुस्तकांपासून मिळणारा आनंद हा जगातल्या इतर कुठल्याही आनंदाहून जास्त मंगलदायी असतो, असं काही लोक का म्हणतात ते !!
आणि एक गुड न्यूज म्हणजे हे पुस्तक वाचून संपवायला फक्त दोन-अडीच तास पुरेसे आहेत.! आयुष्यातले दोन-अडीच तास कुणीही नक्कीच काढू शकतं. एवढंही काही कुणी बिझी नसतं.!
'आभासी ग्रंथालय' या कथेत अशा एका रहस्यमयी वेबसाईटची कल्पना रंगवलेली आहे की ज्यावर भविष्यातील सर्व संभाव्य पुस्तकं आधीच प्रकाशित केलेली दिसतात.
'घरातलं ग्रंथालय' या कथेतल्या एका माणसाच्या पत्रपेटीत आपोआपच ग्रंथ येऊन प्रकट होत राहतात, ते साठवता साठवता त्याला बूड टेकायलाही जागा उरत नाही.
'रात्र-ग्रंथालय' या कथेत रात्रीच्या वेळी आत्म्यांच्या ग्रंथ-संग्रहात रूपांतरित होणारं ग्रंथालय आहे.
'नरकातलं ग्रंथालय' ही कथा अजिबात न वाचणाऱ्या माणसांना मृत्यूनंतर काय मजेशीर शिक्षा दिली जाते, यावर आहे.
'लघुत्तम ग्रंथालय' म्हणजे फक्त एकाच पुस्तकाची लायब्ररी. आणि हे जादूई पुस्तक सतत वेगवेगळ्या पुस्तकांची रूपं धारण करत असतं.
'घरंदाज ग्रंथालय' या कथेत फक्त आणि फक्त हार्ड बाउंड पुस्तकंच आवडणारा एक विक्षिप्त ग्रंथ संग्राहक आहे. आणि त्याच्या संग्रहात जेव्हा एक पेपरबॅक येऊन पडतं, तेव्हा त्या घुसखोर पुस्तकापासून तो स्वतःची सुटका कशी करून घेतो याची मिश्किल कहाणी आहे.
या एकूणच पुस्तकात काही आदरणीय पुस्तकविके, मुरलेले ग्रंथपाल, चॅप्टर लेखक, तसेच acquired taste विकसित झालेले चक्रम वाचक भेटू शकतात. त्यांचे एकेक नखरे पाहून ओठांची एक कड मुडपत सुरु झालेलं स्माईल हळूहळू सूक्ष्म गुदगुल्यांमध्ये रूपांतरित होत राहतं. जरूर वाचून पहा.