Tuesday, 6 February 2024

पुस्तक परिचय - ' खून पहावा करून ' - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर.

 'खून पहावा करून' - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर.

प्रथम आवृत्ती - ऑक्टोबर २०२३. सांगाती प्रकाशन.

समीर चौधरी हा या कादंबरीचा प्रॊटॅगनिस्ट. तो वर्तमानकाळाला मस्तपैकी कंटाळलेला तरूण आहे. त्याला एक अनुभव म्हणून खून करून बघायचा असतो, तर त्यासंबंधी रचना आहे.
तो समाजाच्या काठाकाठानं वावरणारा माणूस आहे.
शिवाय ह्यात सेक्शुअल फॅंटसीजबद्दल फारच मोकळेपणाने लिहिलं गेलंय. फॅंटसीचा आधार घेतल्यामुळे तसं लिहिता आलंय. परंतु तरीही हे धाडसाचं काम आहे. त्याबद्दल मार्क्स दिले पाहिजेत. निवेदनामध्ये केलेले भाषेचे प्रयोग इंटरेस्टिंग आहेत. एकाच वेळी वाचकाला मजकूराशी चुंबकासारखं चिकटवून ठेवायचं, आणि त्याच वेळी ग्रेट काहीतरी सांगायचं, हे यात उत्तम जमलंय.

रोलर कोस्टर राईड सारखं आहे. अनुभवांचं, निरीक्षणांचं, आठवणींचं, पात्रांप्रमाणे बदलणाऱ्या संवादांचं वैविध्य आहे. वेगही कायम राहतो. आणि सेन्स ऑफ ह्युमर तर उच्चच आहे म्हणजे. त्याला काही लिमिटच नाही. कारण काहीही लपवून न ठेवता, न बिचकता लिहायचं असं ठरवलंयच म्हटल्यावर काय..!
वाचता वाचता मध्येच ''प्रेम कसं असावं?' नावाची एक कविता येते. तर त्यातली पहिलीच ओळ वाचली आणि स्फोट झाल्यासारखं हसू फुटलं. न आवरता येणारं, ठसका लागेल असं हासू. नंतर तो मजकूर आठवला की पुन्हा पुन्हा त्याच इंटेन्सिटीनं हसण्याचा जोरदार ॲटॅक येतो. आणि असं हसल्यामुळे समाज, संस्कृती, नीतीमू्ल्ये, नातेसंबंध, नातेवाईक यांकडे बघण्याचे जे अदृश्य मानसिक दडपण किंवा कप्पेबंद दृष्टी असते, ती खुली होते. कारण शेवटी सगळं आपल्या मानण्यावरच असतंय.

तर ही एक सर्वार्थाने वेगळी अनोखी कादंबरी वाटली.
लेखकाला पुस्तकं कशी वाचली जातात, याची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना लेखक वाचकांना चकवतो, खेळवतो. पुढचा मजकूर काय येणार आहे, हे वाचक कधीच गृहीत धरू शकत नाही. एखाद्या अनुभवी शिकाऱ्यानं ट्रॅप लावावेत तसे यात जागोजागी वाचकांसाठी ट्रॅप लावले आहेत. लेखक स्वतः एक जबरदस्त वाचक असल्याशिवाय असा आत्मविश्वास येत नाही.‌

या कादंबरीचे वाचन म्हणजे वास्तव आणि फॅंटसीचा मिलाफ असलेला एक भन्नाट प्रवास आहे. आणि ह्या वाचनप्रवासात लेखक शेवटपर्यंत आपल्या आसपास वावरत असतो. तो काही आपली मानगूट सोडत नाही. आणि आपणही सोडवून घेत नाही. कारण आशयही तसा खच्चून भरला आहे.

1 comment:

  1. खूप छान लेख आहे! दिलेली माहिती अतिशय उपयुक्त वाटली. करिअरविषयी आणखी महत्त्वाचे अपडेट्स आणि संधींबाबत जाणून घेण्यासाठी नौकरी केंद्र (naukrikendra.in) या वेबसाइटला भेट द्या. धन्यवाद!

    ReplyDelete

'द लायब्ररी'

इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत. परिचय क्र. १  (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) : तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्...