Tuesday 9 April 2024

कराड आणि मी


(सदर लिखाण पूर्णतः काल्पनिक असून, कोणत्याही व्यक्ती अथवा स्थळाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. )


१.

कधीतरी बऱ्याच वर्षांनी पुण्याहून कोल्हापूरकडे चाललेलो असतो. कोयनेचा पूल ओलांडला की हायवेशेजारचं पंकज हॉटेल दिसतं. आणि प्रॉब्लेम होतो. भावना उचंबळून यायचा धोका निर्माण होतो. हे असं दरवेळी होतं. दरवेळी नव्यानं होतं.


चौदा वर्षं झाली ग्रॅज्युएशन होऊन. तेवढीच वर्षं हे शहर सोडून झाली. अजूनही या शहराशी असलेला बंध तुटत नाही. एक विलक्षण गुरूत्वाकर्षण जाणवतं कराडच्या आसमंतात आल्यावर..! आता हे जरासं पोएटिक झालं, हे मला मान्य आहे. मलाही अशी सुरुवात करायची नव्हती. पण आता तशी झालीय खरी.


परंतु यापुढे असं लिहून तुम्हाला बोअर न करण्याचं आश्वासन देतो. ज्याला कराडातले लोक प्रेमाने फक्त 'घाट' म्हणतात आणि कराडबाहेरचे लोक ज्याला प्रीतीसंगम म्हणून संबोधतात, तिथल्या टपऱ्यांवर कधीकाळी ओढलेल्या हजारो सिगरेटींची शपथ घेऊन तसं आश्वासन देतो, अध्यक्ष महोदय.


कट टू :

"लेफ्ट साईड ऑफ दि रोड. आणि थर्टी किलोमीटर्स पर अवरचा स्पीड. हे दोन रूल्स कायम लक्षात ठिवायचे बग. चल आता निवांत. काय घाई नाय आपल्याला."

मागचा माझ्या कानात सल्ला देत होता. आम्ही दोघंही टाकूनच होतो.


त्याकाळी माझ्या बाईकला मागं एखाद्या मुलीनं बसण्याची सवय नव्हती. माझ्या बाईकला फक्त बेवड्यांची सवय होती. कॉलेजचा अभ्यास सांभाळत मी युपीएससी सुद्धा करत आहे, वगैरे अफवांमुळे हुरळून जाऊन आईनं सदर बाईक मला घेऊन दिलेली. आया पोरांच्या बाबतीत भाबड्या असतात. आणि त्यांच्या भाबडेपणात दिवसेंदिवस वाढच होत जाते. आणि ही एक चांगली गोष्ट आहे, असं मला वाटतं.


तर हायवे वरच्या एका गुप्त अड्ड्यावर बसून झाल्यावर 'संगम'ला सादा फुलचंद पान खाऊन डुलत डुलत होस्टेलपर्यंत जाणं, हा सवयीचा भाग होता. तसं व्रतच घेतलेलं. डोळसपणे घेतलेलं.


परंतु कमिशनर, एसपी वगैरे नवीन आल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे जशा धाडी माराव्या लागतात, तशीच धाड एकदा त्या गुप्त अड्ड्यावर पोलिसांनी मारली. सगळ्यांची पांगापांग झाली. बिलपण न भरता सगळे पळाले. तर्राट उधळले सगळे घोडे.


एक जोडीदार शेतातून पळता पळता विहिरीत उतरला. आणि तिथेच लपून मला मिस्ड कॉल मारत राहिला. आता हा बाबा विहिरीतनं मिस कॉल मारतोय, हे ऊसात लपून बसलेल्या मला माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि जसा त्यावेळी कुणाकडेच नसायचा तसा माझ्याकडेही बॅलन्स नव्हता. मी त्याला नोकियाच्या डबड्यातून एसओएस चे फ्री मेसेज पाठवत राहिलो.

त्याला पोहता येत नव्हतं. परंतु विहीर कोरडी होती सुदैवानं. त्यामुळे विहिरीत लपून बसलेला हा मनुष्य नंतर डीवायएसपी होऊन बसला. हा एकदम पोएटिक जस्टीस झाला म्हणजे. तर तोपण आता अशाच धाडी वगैरे मारत असेल का? विचारायला पायजे एकदा बसल्यावर.


बाकी, त्या गुप्त अड्ड्याचा मालक दुसरे दिवशी फुकट्यांना शोधत कॉलेजवर फिरत होता, असं समजलं. कॉलेजवर त्याला कोण सापडणार? आम्ही काय कॉलेजला जाणाऱ्यांपैकी वाटलो की काय त्याला? ओळखपरेड फुकट गेली. हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. एकदा जाऊन त्याचं बिल चुकतं करून टाकायला पायजे.

---------------+++++-----------++++++++-----

----------------+++++----------++++++++------

२.

कट टू:-

होस्टेल ब्लॉक सी मधलं बाथरूम. प्रत्येक दहा रूम्ससाठी पाच बाथरूम्स. त्यातलं फक्त एक वापरायच्या कंडिशनमध्ये. कारण इमारत १९६० सालची.


'आरं आटप की लवकर. तू काय आत हस्तमैथुन वगैरे करायलैस की काय?'- मी.


''व्हय. ये, तुला बी देतो माजा शांपू. एकदम फ्रेशे बग."- तो.


''लाव तूच ल*ड्या. पाऊचमदी भरून इकायला चालू कर आता.''- मी.


मध्यंतरी उघडाबंब मी व्हरांड्यात येरझाऱ्या घालताना दिसतो. हे दुष्काळी काय बाहेर येत नाय आज. गानी म्हनत बसलंय आत. दूरी सही जाए ना. आतिफ आस्लम चावलंय ह्येला. रेकतंय निसतं रेड्यासारखं. दहा मिनिटांनी मी दारावर लाथा घालायला सुरु करतो.

"दरवाजा आपटू नगो संप्या लौ**. तुटला बिटला तर सगळंच आवगड हुईल बर गा."- तो.


'आरं मग आटप की बेंचो. मला जायाचाय जरा.' - मी.


"कुटं पोरं पाजाय जायाचाय सकाळ सकाळ? आं? आरं हितं लगा माजा आजून तोंडाला साबन लावायचा राह्यलाय.. आजून माजा पोटाला साबन लावायचा राह्यलाय... आजून माजा मांडीला साबन लावायचा राह्यलाय.. आजून माजा गांडीला साबन लावायचा राह्यलाय.. आन तुजं काय्ये मदीच?"- तो.


हा गृहस्थ साबन फक्त मोती च वापरतो. लोकं खास दिवाळीसाठी वापरतेत. आनी हे कुठं कुठं लावतंय बगा.

मी त्याचा नाद सोडतो. हॉस्टेलपुढच्या हौदातनं बादली बुचकाळून काढतो. अंगावर उपडी करतो. साबण मात्र मी लाईफ-बॉय च वापरतो. मोती चा नॉशिया आलाय.


पुढे कधीतरी मी त्याला हसारामबापूचं 'युवाधन सुरक्षा' भेट देतो. कारण ते शांपू वगैरे म्हणजे युवकांचं धन अस्तं. ते सुरक्षित ठेवायचं अस्तं. असं भिंती रंगवण्यात वाया घालवायचं नस्तंय. चांगलं मार्गदर्शन केलंय बापूनी त्यात.

काय नाय, मनात पाप आलं की लगेच पोट आत खेचायचं. श्वास रोखून धरायचा. डोळे मिटायचे. आनी आईवडीलांचं स्मरण करायचं. पाप जसं आलं तसं आपोआप निगून जातं. आपण फक्त तटस्थपनी बगत राह्याचं. आणि हे सगळं उभ्या उभ्यापन करता येतं. कारन पाप कदी येईल काय सांगता येत नाय. आपण आपलं सारखं सावध राह्यलेलं बरं.

अर्थात, नंतर ते स्वतःच पोट आत खेचायचं विसरले ऐनवेळी. म्हातारपनात विसरतो मानूस. आनी मग जेलात जावं लागलं त्येन्ला. पन ही लै नंतरची गोष्ट झाली. लाईफ इज स्ट्रेंज, यू नो ? या या आय नो.


"या या आय नो"- माझ्या जोडीदाराची चष्मिश क्लासमेट सारखं असं म्हणायची आणि नंतर कॉलेज मॅगझिनमध्ये चिरंतन प्रेमावर कविता लिहायची.

ज्या दिवसांत ऊसाच्या बैलगाड्यांच्या सलग रांगा सह्याद्री कारखान्याकडे जाताना दिसायच्या, त्याच दिवसांतल्या संध्याकाळी ती हातात पुस्तक घेऊन चाललेली दिसते.

मान तिरकी करून बघितलं तर 'ही वाट एकटीची' असं नाव दिसतं. बहुतेक त्या क्षणी तिच्या 'या या आय नो' ची भीती माझ्यापुरती फुस्स होते.

परंतु म्हणून एकूण स्त्री-जातीची म्हणून एक दहशत असते, ती गेली असं होत नाही. ती राहतेच कायम. कारण पोरी म्हणजे काय जोक हे का राव? त्या जोखतेत बरोबर. ठरवलं तर सगळ्या पुरूषपणाला आग लावतेल.‌ ते बी एकदम सुम्ममधी. हासत हासत. कळनार बी नाय, कदी झालं काय झालं कसं झालं.


तिकडे तीपन डोळ्यांच्या कोनातून माझ्याकडे बघते. नजरानजर होते. नजरांची टक्कर होते. नाही, आसमंतात कसलाही वीजांचा कडकडाट होत नाही. किंवा काळ थबकत नाही. किंवा पक्षी उडता उडता अचानक स्तब्ध होत नाहीत. किंवा कयामत ची कहर रात्रही माझ्यावर कोसळत नाही. माझ्या आधीच्या पिढीत हे सगळं व्हायचं. आणि तुम्ही आजकालची मुलं मुली तर पहिल्याच भेटीत डायरेक्ट हल्लाच करता एकमेकांवर, असं मी ऐकून आहे. मला माहित नाही. मी मिलेनियल जनरेशनचा. ना धड इकडचा, ना तिकडचा.


मला फक्त ती बैलगाडीतून सपासप ऊस ओढून काढताना दिसते. ज्या चपळाईनं तिनं ते केलं ते बघून मी अवाक होतो. आता ही झाशीच्या राणीसारखी ऊसाची मोळी पाठीशी बांधून जाईल की काय होस्टेलपर्यंत?


"अरे, तुमची ती अलका कुबल डेंजराय बरं गा..!"- मी जोडीदाराला फोन करून माझा अभिप्राय व्यक्त करतो.


--------------++++++--------------++++------

---------------++++++--------------++++-----

३.


कट टू :


पंढरपूरच्या वेशीवर जसा एक कराड नाका आहे, तसा कराडच्या वेशीवर पंढरपूर नाका नाही. कराडात त्याऐवजी कॅनॉल स्टॉप आहे. जसे इतर शहरांत ट्रॅफिक हवालदार आंबे पाडण्यासाठी वळणांवर दबा धरून उभे असतात, तसे या स्टॉपवरही आडोशाला उभे असतात.


बाईकवर ट्रिपल सीट निघालेले विद्यार्थी दिसतात. एक हवालदार हवेतून अचानक प्रकट होऊन त्यांस साईडला घेतो. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मधला विद्यार्थी लगेच पुढच्याच्या पाठीवर मान टाकून जोरजोरात कण्हायला लागतो. आजारी असल्याचं कहर ढोंग चालू करतो. बाईकवर सगळ्यात मागं बसलेला विद्यार्थी भर घालतो की, आमचा रूममेट आजारीय. तापानं फणफणलंय. दवाखान्यात घिऊन चाल्लोय. एवढा वेळ जाऊ द्या ओ काका.


हवालदार आमच्यावेळचे दयाळू असतात.‌ "आरं तुमी इंजनेरींगची पोरं. कळाय पायजे तुमचं तुमाला." वगैरे किरकोळ खडसावून सोडून देतात. फारच झालं तर एखादेवेळी रस्त्यावर उठाबशा काढायला लावतात.


त्याबद्दल काय तक्रार नव्हती. फक्त हे कुणी एखाद्या उनाड मैनेनं बघू नये, एवढीच इच्छा असायची. कारण नंतर मग ती मैना गर्ल्स हॉस्टेलवर जाऊन सांगणार कुणालातरी की, अगं तुझ्या त्या छाव्याला काल मी कॅनॉल वर उठाबशा काढताना बघितलं. मस्त कानबिन पकडून उठाबशा काढायलेला अन् चोरासारखा बगत होता इकडं तिकडं.‌ भारी मज्जा.!


मग मध्यरात्री फ्री टॉक-टाईम चालू झाल्यावर कुणाचातरी फोन येणार फिदीफिदी हसत की, मला काई बोल्ला नाईस ते? किती काढल्यास उठाबशा? फार दुखत असतील ना पाय वगैरे? आणि तू डाकूसारखा दिसत होतास म्हणे? खरंय का? का असा डाकूसारखा दिसतोस तू?

कळत नाही, काय जादू असते काहींच्या आवाजात. ! उत्साहानं ऊतू जाणाऱ्या त्या थट्टेखोर आवाजातून तिचं असणं सर्वत्र व्यापून राहतं. चांदणं चांदणं होतं सगळं. 

असो..! हे सगळं असोच आता..! आता काय कवी वगैरे होणं परवडण्यासारखं राह्यलं नाय आपल्याला.  


बाकी, हे ट्रिपलसीटवाले आजारी मित्राच्या उपचारासाठी प्रभात नामक थिएटरला चाललेले असतात. 'जन्नत' सिनेमा लागलेला असतो. त्यातलं 'चार दिनों का प्यार ओ रब्बा, लंबी जुदाई, लंबी जुदाई' हे गाणं चालू होतं तेव्हा लोक वळून इकडं तिकडं वर खाली बघायला लागतात की नक्की आवाज कुठून येतोय.? पांडवांच्या मयसभेत गांगरून गेलेले कौरव आठवतात. पण इथलं बावचळणं हे साऊंड सिस्टीम डबा फुटल्यासारखी असल्यामुळे होत असावं.‌


परंतु तरीही हे थिएटर फारच बरं. कारण शेवटी सगळं सापेक्ष असतं. म्हणजे नवीन नवीन कराडात आलेले असताना हे ट्रिपलसीटवाले एकदा घाटावर गेलेले असतात. तिथे भरपूर वळून वळून बघितल्यानंतर आणि बऱ्यापैकी गोल्डफ्लेकी ओढल्यानंतरही आयुष्यातला फारसा वेळ कटलेला नाही, हे लक्षात येतं.


बारची वेळ होईपर्यंत राह्यलेल्या वेळाचं करायचं काय? कसं डील करायचं त्याच्याशी?

म्हणून घाटाशेजारी असणाऱ्या एका निनावी थेटराकडे त्यांचा मोर्चा वळतो. थिएटरमध्ये जाऊन अश्लील मूव्ही बघणं एकाच्या तत्वात बसत नाही. परंतु दुसरा एकजण युक्तिवाद करतो की नेट कॅफेत तर आपण नेहमीच बघतो. इथे मोठ्या स्क्रीनवर सगळं मोठं मोठं दिसतं. चल.


तिथल्या पायऱ्यांवर एक फटीचर मनुष्य झोक जाऊन आडवा-तिडवा डायगोनली अस्ताव्यस्त विखुरलेला दिसतो. आत लागलेला 'प्यासी चुडैल' सिनेमा बघितल्यामुळं या मनुष्याला सदमा बसलेला दिसतो.


आपणही असेच पागल होऊन बघू म्हणत ते भुरटे त्या थिएटरच्या आदिम अंधारात प्रवेश करतात.

कधीकाळच्या कुशन फाटून ध्वस्त झालेल्या खुर्च्यांत बसण्यापूर्वी लोकल कराडातला एक क्लासमेट खणखणीत आवाजात ओरडून ब्रीफींग करतो, "नीट बघून सांभाळून बसा भावांनो.‌ इथली ढेकणं बदमाश आहेत. सरळ सामानापाशी जाऊन खेळत बसतेत. अणुबाँब टाकला तरी मरणार नाईत. आनी वॉश्रुम बिश्रुम काय लाड नाईय्ये इथं. बेवडी लोकं खुर्च्यांवर पन मुतून जातेत कदी कदी. पिच्चर गंडला तर आपन पन तेच करायचं हे. टिल देन, एंजॉय द इव्हनिंग. फ्लोअर इज योर्स.!"


(क्रमशः)

No comments:

Post a Comment

'उद्या'च्या गोष्टी

एक अवाढव्य करडा ढग सगळं अवकाश व्यापून पसरलेला दिसतो सतत. जंगलझडी कडी-कुलुपात बंद करून ठेवलेलीय, असं ऐकलं. झाडांना आळोखेपिळोखे देता येत नाहीत...