साल अमुक अमुक. महिना तमुक तमुक. स्थळ पुणेच. आणि शक्यता बहुतेक कॅन्सरची. एक महिना वाट बघितली. पण एक विशिष्ट लक्षण कमी होत नव्हतं. वाटलं, एवढ्यातच आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालं की काय?
मग येतं वागण्या-बोलण्यात विलक्षण परिवर्तन. एरव्ही आपण कितीही आव आणत असलो तरी मृत्यूची भीती ही सगळ्यात प्रायमल भीती. ती खतरनाक ट्रान्सफॉर्म करते माणसाला. भलेभले गळाठतात, आपण काय चीज?
महिनाभर इंटरनेटवर शोधाशोध करण्यात, मनाची समजूत काढण्यात वेळ काढला.
आवराआवर निरवानिरव कशी करायची ह्याचे अतिरंजित आडाखे बॅकमाईंडला. ते तसेही काही सुचू देत नसतात. शिवाय वरवर सगळं नॉर्मल आहेसं दाखवणं भाग.
मग म्हटलं की असं टांगलेल्या मनस्थितीत राहण्यात काही अर्थ नाही. जे काही आहे ते कन्फर्म करू.
एका डॉक्टरला गाठलं. बोललो की अशी अशी पार्श्वभूमी आहे, अशी अशी स्थिती आहे, असं असं असेलसं वाटतं. ते खुर्चीतल्या खुर्चीत जरा सावरून बसले. मग थोडंफार चेकअप करताना त्यांनी काही प्रश्न विचारले. जमेल तशी उत्तरं दिली. एका अर्थी पापांची कबूलीच म्हणजे.
मग ते बोलले, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा.
आणि आत त्यांची फोनाफोनी चालू असलेली काचेतून दिसते. आवाज हळू आहे. मला इकडे हवाय तात्काळ दिलासा. आणि ही वातावरण-निर्मिती मला अजिबात दिलासा मिळू देत नाहीये.
दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरसोबत पौड रोडला दुसऱ्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये. तिथं काही टेस्ट. दोन दिवसांनी अमुक लॅबमधून रिपोर्ट मिळतील, कलेक्ट करा, असा नंतर फोनवर निरोप.
त्या दोन रात्री टक्क जागा. भयाचं सावट पूर्ण अलूफ मोडमध्ये नेतं माणसाला. जग भकास. त्यात एक मिटलेपण. रंगीबेरंगी, चहलपहल, दिलदुनिया काहीही दिसायचं बंद.
दोन दिवसांनी त्या डॉक्टरच्या लॅबमध्ये वेळेआधीच. रिसेप्शनिस्ट बोलली की पेशंट कुठाय? मी बोललो मीच पेशंट. तिच्या नजरेत कुतुहल, सहानुभूती.
डॉक्टरनी आत बोलावलं. रिपोर्टचा लखोटा हातात दिला.
बोलले, "तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. पण तुम्ही हे सिगारेट वगैरे बंद करा बरं का..! एकदम बंद करा..!"
थरथरत्या हातांनी रिपोर्ट उघडला. वाचला. पुन्हा पुन्हा वाचला. नो मॅलिग्नन्सी डिटेक्टेड. सगळं पूर्ववत करणारे तीन शब्द.
काळजात एक ससा उंच उंच उड्या मारतो. आणि जीवनदायी उर्जेचा प्रवाह शरीरभर..!
खुर्चीतून उठायला लागलो तर डॉक्टर बोलले की थांबा, तोंड गोड करून जा. त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या झेन तत्वज्ञान्यासारखं हसू. ते बघूनच माणूस निम्मा बरा होत असावा.
मी सवयीनं बोललो की नाही, नाही, नको.
ते बोलले, "अहो घ्या. माझीपण चहाची वेळ झालीच आहे. बसा."
चेहऱ्यावर तेच निर्मळ हसू.
टोटली अनोळखी व्यक्तीकडून एवढी ग्रेसफुल ट्रिटमेंट मिळाल्यावर आपल्याला उगाच सेंटी व्हायला होतं. आपण आता जरा पोक्तपणे वागायला शिकलं पाहिजे.
चहा पिलो. जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून उडी मारून बाहेर पडलो. तर रस्त्यावर डिसेंबरातल्या दुपारचं स्वच्छ फ्रेश ऊन. सगळं एकदम शुभ्र शुभ्र. मघाच्या काजळीचा लवलेशही शिल्लक नाही.
हे कुठलंतरी वेगळंच जग आहेसं वाटतंय. किंवा जग तेच आहे आणि आपण बदललोय, असंही असेल. असंच आहे ते..!
साला कुणी कितीही काहीही म्हटलं तरी जग चांगलंच आहे राव..! हे लिहून फ्रेम करून ठेव.
मग त्या रात्री झोपण्यापूर्वी हेडफोनमधून एक प्रार्थना, सलगच्या सलग, कितीतरी कितीतरी वेळा :
जग जीवन, जनन मरण, हे तुझेच रूप सदय..
सृजन तूच, तूच विलय, दे प्रकाश देई अभय..
गगन सदन तेजोमय..
No comments:
Post a Comment