Tuesday, 9 April 2024

काही वाचननोंदी

 १. आधी माझ्याकडे पेंडींग पुस्तकं नसायची. लायब्ररीतून आणायचो, वाचून झाली की परत दुसरी आणायचो.‌ पण मग हळूहळू हावरटासारखा स्टॉक करायच्या मागं लागलो. दिसलं, चांगलं वाटलं की आणायचं. वाट बघायला नको, हक्काचं आपल्याजवळ असलं की हवं तेव्हा वाचू शकतो, हे समर्थन.‌

अशी काही पुस्तकं दरवेळी खरेदी करून आणून ठेवायची. त्यावर नाव-तारीख टाकायची.‌ मग जरा निवांत बसून ती सगळी चाळून बघायची. त्यातलं जे पुस्तक पटकन स्वतःत ओढून घेतं, ते चालू करायचं. बाकीची तशीच निम्मी अर्धी वाचून टेबलवर पडून राहतात, उरलेला भाग जरा नंतर वाचता येतील म्हणून. पण तेवढ्यात आणखी पुढचा स्टॉक येतो. किंवा मधल्या काळात कुणीतरी नवीन लेखक/ लेखिका सापडलेली असते. मग त्यातलीही दोन-तीनच आरपार संपतात.‌ बाकी तशीच.

काही पुस्तकं तर 'नंतर वाचू नंतर वाचू' म्हणत त्या ढिगाऱ्याच्या अगदी तळाशी गेलेली असतात. मग जरा सहा महिन्यांतून एकदा बसून त्यातल्या काही पुस्तकांना टाटा बाय बाय करतो.
मध्यंतरी मी विचारसरणीच्या अंगानं काही पुस्तकं/ कादंबऱ्या वाचत होतो.‌ तर मग तशा पुस्तकांचा खूप स्टॉक होत गेला. मग एकाच विचारसरणीच्या अंगाचं सलग वाचत राहिलं की सगळ्या जगाकडे आपण त्याच दृष्टीकोनातून बघायला लागतो. त्यात काही लिखाण तर एवढं मॅनिप्युलेटीव्ह असतं की सगळं भयावह वाटायला लागतं. डोकं तापतं. कालांतराने बघितलं की कळतं ते काय फार ग्रेट नव्हतं.
मग अशी काही पुस्तकं वर्षभरानंतर नको वाटायला लागलेली असतात.‌ कारण आपणही मधल्या काळात बदललेलो असतो. तर मग त्याही पुस्तकांना निरोप.
आता काही दिवस कायतरी लाईट लाईट वाचायला पायजे.
वैचारिक संघर्ष असलेलं काही वाचायला नको. आपण ट्रिगर होतो. कुठल्याही समाजात वैचारिक लोकं नेहमीच अल्पसंख्याक असणार. एका बाजूला झोंबी, तर दुसऱ्या बाजूला फ्रस्ट्रेटेड. दोहोंच्या मध्ये अथांग पसरलेला मिडलक्लास क्राऊड. त्या बल्क पब्लिकला आपापल्या बाजूनं खेचायची चढाओढ चाललेली. ह्या भांडणात आपण कुदायचं कारण नाही.


. शिवाय वर्षानुवर्षांचा ऑलरेडी सेटल झालेला स्टॉक असतो, त्यातल्या पुन्हा वाचावंसं वाटणार नाही, अशा काही पुस्तकांना निरोप. त्यासाठी निकष एकच, ज्या पुस्तकांत पूर्वी आपण भरपूर भरपूर खुणा करून ठेवलेल्या असतात, ती ठेवायची. ज्यात त्या मानाने कमी खुणा केलेल्या असतात ती काढून टाकायची.

आणून ठेवलेली पुस्तकं आणि त्यातली वाचून संपवलेली पुस्तकं, यातलं प्रमाण गंडत चाललेलं आहे. म्हणजे हावऱ्यासारखी उचलून आणायची पुस्तकं आणि पुन्हा ती विसरून तिसरंच काहीतरी वाचत बसायचं. पुन्हा काही नवीन दिसली की आणायची आणि आधीची विसरून ती वाचत बसायचं. अशानं सगळं गणित बिघडतं. थोडीतरी शिस्त पाहिजेच.


. अलीकडे हिंदीमध्ये मिथिलेश प्रियदर्शीचं 'लोहे का बक्सा और बंदुक', शशिभूषण द्विवेदीचं 'कहीं कुछ नहीं'', अविनाश मिश्र यांचं 'नये शेखर की जीवनी', चंदन पांडेय यांचं 'वैधानिक गल्प', पुरूषोत्तम अग्रवाल यांचं 'नाकोहस';
तसंच मराठीमध्ये मृद्गंधा दिक्षित यांचं 'करुणापटो', संग्राम गायकवाड यांचं 'मनसमझावन' अशी काही पुस्तके आली आहेत. ह्या लेखकांनी आपापल्या पुस्तकांत वैचारिक लाईन मांडण्यासाठी जे प्रयोग केले आहेत, ज्या अफलातून स्ट्रटेजी वापरल्या आहेत, त्यामुळे ही पुस्तकं अतिशय सरस वाटली.
वैचारिक कादंबऱ्या लिहिताना लेखकांनी मन थोडं विशाल केलं पाहिजे, विरूद्ध विचारालापण स्थान दिलं पाहिजे. कारण ते एक उमद्या लेखकाचं लक्षण आहे.‌
पण सध्याच्या काळात ती फक्त आशाच आहे. कारण शीर्षकंच एवढी भडक असतात, टारगेटेड वाचकांसाठी असतात, अंतिम सत्य गवसल्याच्या घोषणेसारखी असतात की आत काय आनंदीआनंद असणाराय हे कळतंच म्हणजे.‌ (उदाहरणार्थ हे शीर्षक कसं वाटतंय बघा : 'जगाला पोखरणारी डावी वाळवी')

. ऐश्वर्या रेवडकर यांची 'विहिरीची मुलगी' वाचली.
फाफटपसारा फार आहे. 'सांगणं' खूप आहे, आणि 'दाखवणं' कमी. वानगीदाखल सांगायचं झालं तर ही एक ओळ- 'आम्ही खूप वैचारिक वाद घातला'
तर त्या पात्रांनी जो वैचारिक वाद घातलेला आहे तो सरळ तिथं लिहायला पाहिजे होता. 'वाद घातला' हे सांगणं झालं. तो वाद तिथं लिहिणं हे 'दाखवणं' झालं.

सांगायला लागली की सांगतच राहते. थांबतच नाही. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगते. कादंबरीचा कच्चा आराखडा एखाद्या चांगल्या जाणकाराच्या नजरेखालून गेला असता, तर ह्यातला तीसेक टक्के मजकूर परस्पर वगळला गेला असता.

सध्या विशीत असणाऱ्या दोन मैत्रिणी ज्या भाषेत संवाद साधतात, ती भाषा लेखिकेनं ऐकलेली नसावी की काय अशी शंका येते. फडके-खांडेकरांच्या काळातली आणि दवणे-वपुंच्या काळात वाचकांनी नाईलाजाने गोड मानून घेतलेली पुस्तकी भाषा, २०२४ साली पुन्हा पुस्तकात आणण्याचं प्रयोजन समजलं नाही.‌ शब्दांच्या फुलोऱ्याचा सोस खूप. जे एका ओळीत सांगून विषय मिटवता आला असता तिथं दीड पान खर्च झालंय.
बाकी मग 'प्रेम हे असं असतं न् आयुष्य हे तसं असतं', 'डोळे डबडबणे', 'अत्यानंद होणे', 'कळी खुलणे', 'सुस्कारा सोडणे' वगैरे सगळं आहेच म्हणजे. आणि कळी तरी किती वेळा खुलणार ना म्हणजे?

ह्यात जे मीरा नावाचं मुख्य पात्र आहे तिचे प्रियकर, मित्र, मैत्रिणी भुईवर घट्ट उभेच राहत नाहीत. पात्रांचं जरा आणखी डिटेलिंग पायजे होतं. काही प्रसंग कृत्रिम, फिल्मी वाटतात. शिवाय यातले आईबापही बडबड फार करतात. आया तर पत्रं पाठवून बडबड करतात. आत्मशोधाच्या नावाखाली ब्लॉग मधले काही पॅराग्राफ येतात अध्ये मध्ये. अस्थानी वाटले. त्यातून कसलाही अर्थ लागला नाही. आणि कसलाही भाव मनात उमटला नाही.
कुणी म्हणेल अशी नकारात्मक शेरेबाजी करणं योग्य नाही.‌
अहो, मग तसं लिहू नका ना.
लेखिका स्वतः चांगल्या ॲकॅडमिक बॅकग्राऊंडची डॉक्टरीण आहे. चांगलं सामाजिक काम आहे त्यांचं‌. त्याबद्दल आदर आहे. परंतु ह्यात लिहिताना स्वतःतील डॉक्टरीणीचा प्रभाव जरा जास्तच पडलेलाय. स्त्रियांच्या लैंगिक, मानसिक किंवा आरोग्यविषयक वैद्यकीय माहिती/प्रबोधन/काऊन्सेलिंग हे सगळं पात्रांच्या तोंडून 'डंप' केलेलंय. ती माहिती चांगलीय. पण हे कादंबरीत लिहिण्याऐवजी पेपरमध्ये लेखमालिका लिहिली असती तर जास्त स्त्रियांपर्यंत ती माहिती पोचली असती.‌ समस्त स्त्रीजातीला शहाणं/सावध करून सोडणं, हा काय कादंबरीचा उद्देश असू नाही.
यावर कुणी म्हणेल, 'छे छे तुला बायकांचं मन कळत नाही.‌'
बरोबर आहे. नाही कळत. पण कळून घ्यायचं कुतुहल आहे म्हणून तर वाचतो ना.‌ तर तुम्हीही ते सांगा जे मला माहिती नाहीये. आणि भाषा जरा 'आज वाचणाऱ्यांना' रिलेट होईलशी वापरा प्लीज. सॉरी. हे सगळं जरा जास्तच हार्श झालं बहुतेक. एवढीही काही खराब नसेल कादंबरी. वाचताना मूड चांगला नसला की हे असं होत असावं.!


. निर्मल वर्मा निःसंशय थोर लेखक आहेत.
वे दिन. अंतिम अरण्य. एक चिथडा सुख. काला कौआ और पानी.‌

मला जे वाटतं ते त्यांना आधीच वाटून गेलेलं आहे. आणि ते शांतपणे लिहिलंय, जसं लिहायला पाहिजे. आक्रस्ताळेपणा नाही. आग्रह नाही.‌ आव नाही. राग नाही. चीडचीड नाही. जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार.‌ एकटेपणा.‌ फार तर दुकटेपणा.‌ तोही मिश्किल. विचारसरणी नाही.‌ पूर्वग्रह नाही. देश नाही. देशभक्ती नाही. घर नाही. संस्कृती नाही.‌ निरा मोकळा सडा माणूस.
माणसानं माणसासाठी लिहावं. निरर्थकतेची चित्रं लिहावी. आणि हे कुठंतरी विदेशात घडलेलंय.‌ पन्नास वर्षांपूर्वी.
तर पुढच्या पिढीतल्या वाचणाऱ्यासाठी लिहावं. त्यांना सांगावं आज आत्ता इथं माझं काय होत होतं. जगण्याचा एवढा किस कसा काय काढलाय ह्यांनी.‌ निवांत सवड कशी मिळाली ? कोण कुठला हा लेखक. माझ्या वाट्याचा विचार तोच करून मोकळा झालाय. त्याचे विचार मला आज लागू पडतायत. आवडतायत. भिडतायत. म्हणजे ह्या सगळ्यातून तोपण गेलेला असणार.

प्राग, व्हिएन्ना, लंडन, बुडापेस्ट, सिमला.. लोक‌ युरोपातले महिनोन्महिने फिरत राहतात. आर्ट गॅलरी, चर्च, कलांचा आस्वाद, फिल्म्स पेंटींग संगीत दारू पब्ज वगैरे.‌ इथं साला जॉब सत्तर टक्के आयुष्य शोषून घेतो‌. मान वर काढायला फुरसत देत नाही. एकाच काळात किती वेगवगळी जगं असतात.
वाचताना एखादं चांगलं वाक्य डोळ्यांपुढे आलं की लगेच ते जगजाहीर करावंसं वाटणं, सगळ्यांना सांगावं वाटणं, हा बालिशपणा आहे. आपण आता तो बंद करायला पाहिजे.
त्यापेक्षा एक चॅप्टर वाचून पानांत बोट ठेवून पुस्तक छातीवर ठेवावं. वाचलेलं मुरू द्यावं. घोळवावं. हे बरंय.


. ओरहान पामुक या इस्तंबूल च्या लेखकाची 'दि रेड हेअर्ड वुमन'. धुक्यातनं वाट काढत जाणारी कादंबरी. हुकुमशाही तिकडेही आहेच.
हंकन गुंदे ची 'एक होता गाझा'. मानवी तस्करी बद्दल.
मनाची युद्धभूमी झालेलीय. एकाच काळात सात ते आठ जागतिक दर्जाचे लेखक/लेखिका तुर्कस्तानात अस्तित्वात आहेत. तुर्की वाचकांची चैन आहे.


. मनस्वीनी लता रवींद्र आणि शिल्पा कांबळे या दोघींच्या 'मुक्त शब्द' मधल्या कथा वाचल्या. ह्यातल्या स्त्री नायिका धर्मांध दाखवल्यात. ही स्ट्रॅटेजी दिसतेय. मुद्दाम वाकड्यात शिरून सगळं डार्क करून दाखवायचं. आणि वाचणाऱ्याला लाज आणायची. इलाज नाही. या वातावरणात डायरेक्ट ॲटॅक करून काय उपयोगाचं नाही. लिहायचं तर अशाच कायतरी नवीन वाटा शोधल्या पाहिजेत.

मानव कौलची 'तितली'. मृत्यूवर कसलं भारी लिहिलंय ह्यानं. रात्री दीड-दोन वाजता सगळी सामसूम असते, तेव्हा वाचायला हे काढून ठेवलं पाहिजे.
मानव कौलचा 'ठिक तुम्हारे पीछे' हा त्याचा सगळ्यात चांगला कथासंग्रह. तो आवडला म्हणून इतर काही पुस्तकं आणली. आणि ती तीन वेगवेगळ्या महिन्यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वाचायचा प्रयत्न करून बघितला. आणि शेवटी एवढी काही खास नाहीत असा निष्कर्ष काढला.‌

डॉ. जयसिंगराव पवारांनी संपादित केलेला 'राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ'. हे फार मोठं काम आहे. राजर्षींबद्दल जे काही संदर्भ पाहिजे असतील ते सगळे एका जागी मिळतात. तात्कालीन पत्रं, दुर्मिळ फोटोग्राफ्स, कागदपत्रं, वर्तमानपत्रांतली कात्रणं, दरबारचे आदेश, भाषणं, अहवाल, आठवणी, सगळ्या लेखांचं संकलन. सगळं सणसणीत काम आहे म्हणजे. लोकराजा च्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं. आवडलं आपल्याला.


. ग्यान चतुर्वेदी लहान मुलासारखं निर्मळ, प्रांजळ हसतात.‌ ह्या वयात एवढा आनंदी कसा काय राहू शकतो हा माणूस?
काशीनाथ सिंह यांचं 'याद हो कि न याद हो' हे संस्मरण. समकालीन लेखक, कवींबद्दल अतिशय हृद्य लिखाण आहे. मराठीत 'असं' चांगलं संस्मरण अजूनतरी वाचनात आलं नाही.
आशुतोष भारद्वाजचं 'मृत्यूकथा: नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम'.
नक्षलवादावरचं आजवर वाचलेलं सगळ्यात उत्तम पुस्तक.‌
उत्तुंग लेखनप्रतिभेची झलक. सर्जनशील कादंबरी प्लस वेगवान रिपोर्ताज, असं कॉम्बिनेशन. गुंतवून ठेवणारं, भयाण अस्वस्थ करणारं.‌ एका इश्यूचे एवढे विविध पैलू. तेही कुणाचीही बाजू न घेता. ग्रेट.
शिवाय, ह्या लेखकामुळं हिंदीतला कृष्ण बलदेव वैद हा आणखी एक टोलेजंग लेखक माहिती झाला. सध्या त्याचं फक्त 'माया लोक' मिळवलंय. तर हा एक लेखक संपूर्ण मिळवून वाचावा लागेलसं दिसतंय.

भकास तारूण्याबद्दलची पुस्तकं खूप येत आहेत. प्रदीप कोकरेचं 'खोल खोल दुष्काळ डोळे' हे एक. शिव्या खूप आहेत. अप्रासंगिक वाटतात. आणि नुसत्या शिव्या लिहून काय होतं? हे असलं तर माझ्यासारखेपण लिहू शकतात. बाकी, ह्यातली नेमाडे आणि तुकारामांबद्दलची निरीक्षणं आवडली.

No comments:

Post a Comment

'द लायब्ररी'

इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत. परिचय क्र. १  (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) : तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्...