मित्तरसैन मीत हे पंजाबमधले मोठे लेखक आहेत. त्यांची कौरवसभा ही मूळची पंजाबी कादंबरी आहे, तिचा भारतीय ज्ञानपीठानं हिंदी अनुवाद केलाय.
कादंबरी अजस्त्र आहे. तिला वेग आणि खोली असं दोन्ही आहे. हातात घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अवघड आहे. कोर्टकचेरीच्या आणि त्यामागे चालणाऱ्या पडद्याआडच्या हालचालींच्या जंजाळात आत आत हरवत चाललो तरी "पुढं काय होणार" याची उत्सुकता सुरूवातीपासून शेवटपर्यंत ताणलेली राहते. त्यामुळे दिवसभर मॅरेथॉन रिडींग.!
मायानगर नावाचं एक काल्पनिक शहर. तिथं घडलेला एक गुन्हा आणि त्यासंबंधी चाललेली कोर्टकेस, यांचा आधार घेऊन या कादंबरीचा डोलारा उभा आहे. न्यायाची व्यवस्था सडलेली आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळे आपादमस्तक बरबटलेले आहेत, हे वरवर माहित असतं. पण ते नेमकं कसं? याचं जिवंत चित्रण यात येतं. महापुरानं भरलेली नदी जशी रोरावत येताना दिसावी तशी ही कादंबरी गाळण उडवते.
लेखक स्वतः आयुष्यभर वकील राहिलेले आहेत. त्यांनी हे सगळं आतून बघितलेलं आहे. तर हे बघितलेलं भोगलेलं वास्तव यात आलेलं आहे. 'भोगा हुआ यथार्थ' !
ते या व्यवस्थेशी संबंधित सगळे कंगोरे अत्यंत बारकाईनं उलगडून दाखवतात. व्यवस्थेतला कुठलाच पैलू ते सोडत नाहीत. या माणसाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. आणि 'जे आहे ते असं आहे', एवढंच ते मांडतात. अर्थनिर्णयाची जबाबदारी वाचणाऱ्यावर टाकतात.
हितसंबंधांची ही गुंतागुंतीची वॉटरटाईट साखळी. राजकारणी, उद्योगपती, वकील, जज, मिडीया, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर्स, जेलर्स, दलाल अशा सगळ्या लागेबांध्यांचं नातेसंबंधांचं मायाजाल ! त्याचं हे भीषण विश्र्वरूप दर्शन! ते आपण बघून थक्क, हतबुद्ध.! नैतिक अनैतिकतेच्या भल्या-बुऱ्याच्या आपल्या समजूती अगदीच बाळबोध वाटायला लागतात. या भोळ्या समजूतींवर हसू यायला लागतं
बाकी, हा चिखल काही दुरूस्त होण्यापैकी नाही. कुवतीबाहेरचं काम आहे ते. या भानगडीत कुणी पडला तर प्युअर फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीही हाताला लागत नाही. यापासून चार हात लांब रहा किंवा मग त्यात लडबडा. तिसरा पर्याय नाही. अशा व्यवस्थेत चुकून एखाद्याला खरा न्याय आणि वेळेवर मिळालाच, तर तो देवदुर्लभ योग म्हणावा लागेल.
तर आपल्याला ज्या दुनियेतलं कणभरही माहीत नव्हतं, असं एक संपूर्ण वेगळं आयुष्य दिवसभरात जगून पार केलं. मोठा मानसिक प्रवास आहे हा. थकवणारा. भंजाळून टाकणारा. आता पुढचे चार दिवस एक शब्दही वाचवणार नाही.
No comments:
Post a Comment