Monday, 3 February 2025

'गुरू'-पुस्तक परिचय

नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे यात एवढी कशिश आहे की एक संपूर्ण दिवस चिटकून बसलो आणि आरपार संपवूनच टाकली. पहिली तीन प्रकरण, 'दुःख', 'तृष्णा', 'गंध', एकदम क्लास आहेत. 'दुःख' या प्रकरणात एका प्रलयंकारी पावसाचं आणि त्यामुळे हाहाःकार उडालेल्या भावी शहराचं विदारक चित्रण वाचताना सारामागोच्या ‘ब्लाईंडनेस’ची आठवण झाली. आख्खं प्रकरणभर असा कहर बरसणारा, जाणीवा सुंद करून टाकणारा पाऊस मराठीत आजवर झालेलाच नाहीये.!

एकविसाव्या शतकाच्या या पूर्वार्धातली जीवनशैली, तिची गुंतागुंत, त्याखाली रगडल्या जाणाऱ्या माणसांची नस यामध्ये नेमकेपणाने पकडलीय.‌ रिअल इस्टेटशी, नगररचनेशी संबंधित व्यवहारांतील भाषेची लेखकाला फार चांगली जाण आहे.‌ शिवाय आश्रमांचं, कार्पोरेट बुवाबाजीचं, मिडीयाचं, सोशल मिडियाचं, एकूणच सगळ्या जगण्याच्याच बाजारीकरणाचं चित्रण वास्तवदर्शी आहे. एखादा गंभीर लेखक किती अनेक अंगांनी भोवतालाचा वेध घेऊ शकतो, बाजार-व्यवस्थेकडून हे जे मायाजाल विणलं गेलंय, त्याला किती ताकदीनं भिडू शकतो, आणि ते ध्वस्तही करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

कादंबरी एकूण सहाशे पानांची आहे. थकवणारी आहे. त्यापैकी ३३६ व्या पानापर्यंत सगळं जबरदस्त आहे.! पण तिथून पुढे जरा वेगळाच गिअर टाकलाय. तिथून वास्तवाचा सांधा सुटून कल्पिताच्या, स्वप्नाच्या प्रदेशात जास्तच वावरत गेल्यासारखी वाटते (म्हणजे मला तरी तसं वाटलं). तरीही अवश्यमेव वाचण्यासारखी आहे.

समकालीन हिंदी साहित्यात असा मोठा अवकाश निरखणारे, तेवढा दमसांस असणारे चार-पाच लेखक वाचून माहिती झाले आहेत. आता मराठीतही अशा एका दमदार कादंबरीचं आगमन झालं आहे, याचं अप्रूप/कौतुक वाटलं.



No comments:

Post a Comment

'गुरू'- पुस्तक परिचय नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे या...