Wednesday 10 April 2024

साधी गोष्ट

 स्वारगेटला उतरलो. बस स्टॅंडवर उद्घोषणा. प्रवाशांनी आपलं सामान कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये. अश्लील आहे हे.

पण तसं बघायला गेलं तर, आधी केले मग सांगितले, हेपण अश्लील आहे. एकेकाचा नजरीया म्हणायचं. दुसरं काय?

जेण्ट्स वॉशरूम. नेहमीचं गर्दीचं दृश्य. सगळे एका लाईनीत उभं राहून चेहरा शक्य तेवढा गंभीर ठेऊन कार्यक्रम उरकत असतात. मागं कुणीतरी वाट बघत उभं असेल तर त्या अदृश्य दडपणामुळं मला प्रॉब्लेम होतो. त्यात समोरच्या भिंतीवर मुंग्यांची रांग. त्यात एक मुंगी आजारी वाटतेय. बाकीच्या मुंग्या तिच्यापाशी थांबून विचारपूस करून जातायत. मी त्यात गुंग. क्षणभर आपण इथं कशाला उभं राहिलोय तेच विसरलो.

स्टँडमधून बाहेर.
मुटकुळं करून बसलेली कुत्री. नाराज दिसतायत. भुंकण्यावर निर्बंध आहेत. चॅनेलवाल्यांचे माईक काढून ह्यांना दिले तर वस्तूचा काही उपयोग तरी होईल. सरकारनं कायतरी केलं पायजेल.
'भैय्या, आपके पास गुगल पे है क्या ?'
एक टकाटक पोरगं एका भिकाऱ्याला विचारतंय. त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत, जे आता नष्टच झाले. परिणामी दानधर्माचं पुण्य घेण्यामध्ये गॅप निर्माण झालाय. सरकारनं कायतरी केलं पायजेल.

कात्रज वरून खचाखच भरलेली एक बस आली आणि कण्हत कण्हत स्टॉपवर थांबली.
मागनं पाच मिन्टात आजून एक बस येनाराय आनी ती आख्खी रिकामीच असनाराय, असं कायतरी कंडक्टर ओरडतोय. पण हे नेहमीचंच आमिष आहे. कोण विश्वास ठेवणार ? सगळे तातडीनं घुसायला बघतात. मी पण.
आई बाप आणि पोरगं दिसलं की हे कार्टं आई-बापापैकी कुणावर गेलंय, ह्याचा अंदाज बांधत बसायची सवय आहे. वेळ बरा जातो. दापोडीला बसायला जागा मिळाली. तेवढ्यात एकाने, जरा सरका ओ, म्हणत माझ्या डोळ्यांपुढून खिडकीतून बाहेर एक जोरदार पिंक टाकली. आता ती समजा खाली कुणाच्या अंगावर पडली असती, आणि तो आळ माझ्यावरच आला असता, तर मी त्या प्रसंगाला कसा समोरा गेलो असतो, इत्यादी स्वरूपाच्या मध्यमवर्गीय भीतीनं काळीज पाचेक मिनिटं धडधडत राहिलं.

रूमवर पोहचतो. मित्र फोनवर आहे. आवाज वाढलेला आहे. त्याच्या कुठल्यातरी प्रेयसीचा भाऊ त्याला मारायला येणाराय, असं संभाषणातून कळतं. आता आपल्याला मध्यस्थी करावी लागतेय की काय? माझी धडधड. ह्याला कितीवेळा सांगितलं. प्रेमं वगैरे करायला एका विशिष्ट समाजातल्या मुली बऱ्या असतात. जरा पोस्टमॉडर्निश वातावरण असतंय त्येंच्यात. सहसा हाणामारीची वेळ येत नाय. पण ऐकतो कोण ? भोगा आता.
रात्रभर मुबारक बेगमचं 'कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी' ऐकत ऐकत झोपलो. पहाटे तिला एक 'गुड मॉर्निंग'चा निरुपद्रवी मेसेज केला.
तर ‘रात्रभर झोप नाही. गुड मॉर्निंग कशी म्हणू?’ हा रिप्लाय. स्वप्न तुटलं. आजारी पडल्यासारखं वाटलं.

आजारी. खरोखरच. जाम अंगदुखी. वीकनेस. नेहमीचं क्लीनिक.
नर्स: हा घ्या. थर्मामीटर लावून बघा.
मी : ताप नाहीये पण मला.
नर्स: असू द्या. लावा. पद्धत है तशी.
नर्स: आनी तब्बेत लै बारीक झाली. काय खात नाय का?
मी: काय आता, शरीर म्हटल्यावर चालायचंच.
नर्स: अवो,ते म्हाताऱ्या माणसाचं झालं. तुम्ही जवान हाईत की अजून.
ह्याच्यावर कायतरी फिलॉसॉफीकल बोलायचं होतं, पण ऐनवेळी आठवलं नाही. वय जाणवायला लागलं वो आता.

बहुतेक त्यापुढच्या सकाळी एफसी रोडवरच्या त्या प्रसिद्ध कॅफेपुढे तिची वाट बघत मी उभा. एक शासकीय कार थांबते. काळा गॉगल लावलेला एक साहेब त्यातून उतरतो. आता तो खिशातून पिस्तूल काढून मला गोळी घालेल का? नाही. तसं काही होत नाही. साहेब डोसा खायला आत. ड्रायव्हर कम हवालदार राहील बाहेरच वाट बघत उभा. ती येते. आम्ही आत जातो. डोसा यायला उशीर आहे. बसून बसून काय करायचं. जीवन वगैरेसंबंधी हायफाय चर्चा करण्यासाठी हा कॅफे आहे.
'काय बघतोयस?' ती
'तिकडच्या कोपऱ्यातली आंटी मस्त आहे', मी डोश्याचा तुकडा उचलत, सूर सहज ठेवत म्हणतो.
'मग मी इथं कशासाठी आहे?' तिच्या आवाजात आश्चर्य.
'तू काही नेहमीच असत नाहीस, असणार नाहीस.' मी.
'तुला काय पाहिजे नक्की?' ती गढूळ डोळ्यांनी विचारते.
'तू पाहिजेस. हवी तेव्हा. हवी तेवढी.' मी.
'तू आता परत तेच सुरू नकोस करू बरं का.' हे बोलत असताना ती तिची पावलं टेबलखालून माझ्या पावलांवर फिरवत राहते. थंड अंगठयानं पावलांवर वर्तुळं वर्तुळं काढत राहते.
'काय होतंय?' मी
'कुठे काय?' पायगुंता तसाच चालू ठेवत ती विचारते.
'हे असं टेबलखालून फ्लर्ट करणं अलाऊड आहे वाटतं इथं?' मी स्वतःची सळसळ उघडकीस येऊ न देता विचारतो.
'मला सगळं अलाऊड आहे.' ती तिच्या बोटांनी माझी बोटं पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणते.
‘चल. आपण बाहेर चालत चालत बोलू. समोरासमोर बसून बोलण्याची मला सवय नाही. जुना प्रॉब्लेम आहे.’ मी.
बाहेरच्या हवालदारानं आता मोबाईलमध्ये डोकं घातलेलं असतं. वेळ घालवण्यासाठी तोच एक पर्याय असतो.

बहुतेक त्यानंतरच्या की कुठल्याशा सकाळी मी तिला विचारलेलं, ‘आपण काही काळ एकत्र रहायचं का?’
‘का रे? लिपस्टिकची चव आवडली की काय?’ त्यावर हा रिप्लाय.

भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात बघताना त्याकडे कसं बघायचं याचं स्वातंत्र्य असतंच. ते स्वातंत्र्य वापरलं पाहिजे. तेव्हा माहित नसतं की पुढे असं असं होणाराय. तर झालं ते चांगलंच झालं, असं समजून लिहायला काय हरकत आहे?
लॅपटॉप बंद करतो. उठतो. ब्लेंडर्स प्राईड आणि पाणी ग्लासात ओतून ओळखीचं मिश्रण बनवतो. एक गल्प मारतो. बरं वाटतं. बरं वाटत असताना कोण लिहिणार? लिहून बरं वाटत असेल तर वेगळं. बाकी, कथांमध्ये अशी प्रेमप्रकरणं जुळवून स्वतःचे प्रॉब्लेम्स सुटत नसतात, ही साधी गोष्ट लेखकाला कधीतरी कळेल अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment

साधी गोष्ट

  स्वारगेटला उतरलो. बस स्टॅंडवर उद्घोषणा. प्रवाशांनी आपलं सामान कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये . अश्लील आहे हे. पण तसं बघायला ...