Tuesday, 31 December 2024

'कौरव सभा'

 मित्तरसैन मीत हे पंजाबमधले मोठे लेखक आहेत. त्यांची कौरवसभा ही मूळची पंजाबी कादंबरी आहे, तिचा भारतीय ज्ञानपीठानं हिंदी अनुवाद केलाय.

कादंबरी अजस्त्र आहे. तिला वेग आणि खोली असं दोन्ही आहे. हातात घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अवघड आहे.‌ कोर्टकचेरीच्या आणि त्यामागे चालणाऱ्या पडद्याआडच्या हालचालींच्या जंजाळात आत आत हरवत चाललो तरी "पुढं काय होणार" याची उत्सुकता सुरूवातीपासून शेवटपर्यंत ताणलेली राहते. त्यामुळे दिवसभर मॅरेथॉन रिडींग.!

मायानगर नावाचं एक काल्पनिक शहर. तिथं घडलेला एक गुन्हा आणि त्यासंबंधी चाललेली कोर्टकेस, यांचा आधार घेऊन या कादंबरीचा डोलारा उभा आहे. न्यायाची व्यवस्था सडलेली आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळे आपादमस्तक बरबटलेले आहेत, हे वरवर माहित असतं. पण ते नेमकं कसं? याचं जिवंत चित्रण यात येतं. महापुरानं भरलेली नदी जशी रोरावत येताना दिसावी तशी ही कादंबरी गाळण उडवते.

लेखक स्वतः आयुष्यभर वकील राहिलेले आहेत. त्यांनी हे सगळं आतून बघितलेलं आहे. तर हे बघितलेलं भोगलेलं वास्तव यात आलेलं आहे. 'भोगा हुआ यथार्थ' !

ते या व्यवस्थेशी संबंधित सगळे कंगोरे अत्यंत बारकाईनं उलगडून दाखवतात. व्यवस्थेतला कुठलाच पैलू ते सोडत नाहीत.‌ या माणसाच्या नजरेतून काहीही सुटत नाही.‌ आणि 'जे आहे ते असं आहे', एवढंच ते मांडतात. अर्थनिर्णयाची जबाबदारी वाचणाऱ्यावर टाकतात.

हितसंबंधांची ही गुंतागुंतीची वॉटरटाईट साखळी. राजकारणी, उद्योगपती, वकील, जज, मिडीया, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर्स, जेलर्स, दलाल अशा सगळ्या लागेबांध्यांचं नातेसंबंधांचं मायाजाल ! त्याचं हे भीषण विश्र्वरूप दर्शन! ते आपण बघून थक्क, हतबुद्ध.! नैतिक अनैतिकतेच्या भल्या-बुऱ्याच्या आपल्या समजूती अगदीच बाळबोध वाटायला लागतात. या भोळ्या समजूतींवर हसू यायला लागतं

बाकी, हा चिखल काही दुरूस्त होण्यापैकी नाही. कुवतीबाहेरचं काम आहे ते. या भानगडीत कुणी पडला तर प्युअर फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीही हाताला लागत नाही. यापासून चार हात लांब रहा किंवा मग त्यात लडबडा. तिसरा पर्याय नाही. अशा व्यवस्थेत चुकून एखाद्याला खरा न्याय आणि वेळेवर मिळालाच, तर तो देवदुर्लभ योग म्हणावा लागेल.

तर आपल्याला ज्या दुनियेतलं कणभरही माहीत नव्हतं, असं एक संपूर्ण वेगळं आयुष्य दिवसभरात जगून पार केलं. मोठा मानसिक प्रवास आहे हा. थकवणारा. भंजाळून टाकणारा. आता पुढचे चार दिवस एक शब्दही वाचवणार नाही.



'सिमसिम'

 गीत चतुर्वेदींची 'सिमसिम' म्हणून एक कादंबरी आहे.

एका वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सिंधी मनुष्याच्या स्मृतींचा ठाव घेत ही कादंबरी उलगडत जाते.‌ वर्तमानात मुंबईत रहिवसलेला हा मनुष्य कराची-लारकाना स्मृतींतून जिवंत करत राहतो. त्याच्यासोबत आपल्यालाही आठवणींच्या या दुतर्फा उघडणाऱ्या भुयारातून टाईम ट्रॅव्हलला नेतो.

ही कादंबरी विभाजनादरम्यान सिंधी समाजावर कोसळलेल्या हाल-अपेष्टांना, यातनांना भाषा देते. ही भाषा आक्रस्ताळी, किंचाळून लक्ष वेधून घेणाऱ्यांपैकी नाही.  ही शाश्वत, सोशिक आहे. ही मूक रूदनाची भाषा आहे. ही क्रंदनाची भाषा आहे.

ही कहाणी भावनिक-मानसिक निर्वसनाची व मृत्यूबोधाची जितकी आहे, तितकीच प्रेमाची-जिंदादिलीची-उमेदीची देखील आहे.

मुंबईत लॅंडमाफियांची जागेची जी सदैव पेटलेली हवस असते, त्यातून आपली लायब्ररी वाचवायला धडपडणाऱ्या वृद्धाच्या जूनून ची ही कहाणी आहे.

यातल्या त्या लायब्ररीत पुस्तकं बोलतात, नाचतात, गातात, त्यांच्या निष्पाप भावना सांगतात, ते प्रकरण आत्म्याला स्पर्श करणारं आहे.! पुस्तकांबद्दल, लायब्ररीबद्दल अपार माया असणारा हा गोड म्हातारा, प्रेमात पडावा असा आहे.‌

आपण आत्ता ज्या सुपरफास्ट काळात थरथरत आहोत, त्या काळाचं वजन समजून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी.

गीत चतुर्वेदी हे एकविसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या एकेक कलाकृती वाचताना ते तसे का आहेत, याची झलक आपोआप मिळते. 

सिमसिम च्या इंग्रजी अनुवादाला 'पेन अमेरिका ट्रान्सलेशन ॲवॉर्ड' आहे. कारण हे सगळं तसं वैश्विकच आहे म्हणजे.

Wednesday, 11 December 2024

काही वाचननोंदी - २

१. गुणवंत शाह यांचं 'अस्तित्वाचा उत्सव'.!
हे ईशावास्य उपनिषदावर आहे. म्हणजे त्यातला एकेक श्लोक चिंतनासाठी घेऊन लाईफटाईम रिलॅक्सिंग मैफिल रंगवलेली आहे. रजनीशांनीही ईशोपनिषदावर प्रवचनं दिलेलीयत पूर्वी, पण हा आशय त्याहून उजवा वाटतो.
प्रदीर्घ डिप्रेशन, सिनीसीझम, ठराविक काळाने येणारं सेल्फ डिस्ट्रक्टींग विचारांचं आवर्तन, पराकोटीची व्याकुळता, परात्मभाव, विलगता, मिनींगलेसनेस, नथिंगनेस अशा जीवन-अवस्थांसाठी हे चांगलं आहे.
'टू बी ऑर नॉट टू बी?'. 'आता काय करू?'. एकच सवाल आहे. एकच रोकडा सवाल आहे. आता पळायला जागा नाही. आत्ता या क्षणी या क्षणाचा सामना करावाच लागणार आहे. काहीतरी तड लावावीच लागणार आहे.‌ हा प्रश्न आता पुढे ढकलता येण्यासारखा नाही. तो ऑप्शनच नाही. हे कसं हॅंडल करणार ? कळत नाही.! 'सिदन्ति मम गात्राणि' म्हणत हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनासारखी स्थिती !
भयाण रिकामपण घेऊन वेळा येतात. सगळं आतल्या आत थिजून बसतं. आता करू तर काय करू ? आणि कशासाठी करू? सगळं डवांडोल.! इंटरेस्टच खतम.
कसलीही हालचाल करू म्हटलं तरी अर्थ दिसत नाही. मन एकेक करून सगळ्यालाच नकार द्यायला लागतं. एक काळोखी गर्त भयकातर. अथाह पोकळी. नथिंगनेस जडशीळ आकार ऊकार नसलेला. कसं हॅंडल करायचं ?
अशा वेळांसाठी हे पुस्तक औषधी आहे. काही नाही. उघडून फक्त एक-दोन पानं डोळ्यांपुढून सरकू द्यायची. मनाची अवस्था आधीसारखी राहत नाही. जीवेषणा परतून येते. एक रिलीफ, एक ट्रॅंक्विलीटी.! आह्!
पण हे पुरवून पुरवून वापरायचं आहे. थोडं थोडं चमचा चमच्यानं एकेक घोट.‌ एकेक पान वाचून, मुरवून, त्याच्या अर्थाचा जगण्यात शोध.‌ वाचता वाचता थोडं थोडं मन सुटतं. मौन उतरतं. यावर हात ठेवून ध्यान करावं, वाटतं. करावं. हे पुस्तकच सखोल ध्यानातून, चिंतनातून आलेलं असावं.
२. आयन रॅंडची ॲटलास श्रग्ग्ड आणि फाऊंटनहेड ही दोन पुस्तकं ऐन तारुण्यात वाचली की माणूस भारावून जातो. दहा वर्षांपूर्वी भेटेल त्याला ही रिकमेंड करत होतो.
आजकाल आणखी एकदा चाळतो. पुस्तकं तीच, मजकूर तोच. मधल्या काळात खाजगीकरणाचे फटके खात शोषित झालेलो, त्यामुळे आधीचं भारावून जाणं वजा झालं. आता तिच्या युक्तिवादातल्या कमजोर जागा लक्षात येतात. मॅडम ज्या आदर्श भांडवलशाही व्यवस्थेचं तत्वज्ञान मांडतायत, ते फक्त फॅंटसीतच शक्य आहे.
ही पुस्तकं १९४०-५० च्या दशकात लिहिली गेलीयत. तो काळ कम्युनिझमच्या जोराचा होता. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मॅडमनी हे ऑब्जेक्टिव्हिजम चं तत्वज्ञान मांडलं. व्यक्तीवाद.! मी, माझं, माझ्यापुरतं.! आणि तसं जगण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था ही आदर्श व्यवस्था.! तिच्या उदात्तीकरणासाठी मॅडमनी मस्त लेखणी झिजवलेली आहे. टोलेजंग बॅटिंग केलेली आहे.
आता कम्युनिझमचा काळ कधीच मागे पडलेलाय.‌ कम्युनिस्ट त्यांच्या मरणानं मरून गेलेत. पण तरीही लेखिकेच्या कादंबऱ्यांत कल्पिलेले प्रतिभावंत उद्योजक कुठे प्रकट झालेले दिसत नाहीत.‌ आजकालचे जे बिग जायंट उद्योजक म्हणवतात, ते माफिया/कार्टेल च आहेत. यांना कसली फिलॉसॉफी न् कसलं काय? हे भामटेच आहेत सरळसरळ.
तर आता लेखिकेच्या पल्लेदार भाषेचा फुलोरा बाजूला सारून नीट बघितलं तर उरतात तिचे ते सुपरमॅन नायक-नायिका.!!हार्वर्ड रॉर्क, डॉमिनिक फ्रॅंकन, गेल वायनांड, फ्रॅंको डॅंकोनिया, डॅग्नी टॅगार्ट, हॅंक रिअर्डन वगैरे.! आणि त्यांचे लांबलचक मोनोलॉग्ज, डायलॉग्ज..! ते वाचा, दूरूनच रामराम करा आणि विसरून जा.! हिचा ॲटिट्यूड आता डोक्यात जायला लागला आहे.
बाकी, लेखिकेने सोशल सिक्युरिटी किंवा आर्थिक दुर्बलांना व्यवस्थेकडून दिली जाणारी मदत वगैरे गोष्टींना आयुष्यभर विरोध केला. कारण आर्थिक दुर्बल म्हणजे मिडिऑकर.! सर्वसामान्य. ॲव्हरेज जनता पब्लिक.! तर अशांविषयी खास अमेरिकन तुच्छताभाव किंवा परात्मभाव.!‌ आणि मॅडमवर स्वतःवर म्हातारपणात वेळ आली तेव्हा सगळे सोशल सिक्युरिटीचे, मेडिकेअर वगैरेचे लाभ मिळवले. स्वतःचं तत्वज्ञान स्वतः तरी पाळायला पाहिजे होतं. असो.‌ तर हेच साठाव्या वर्षी वाचलं तर कदाचित अजून टाकाऊ वाटायला लागेल. बघूया.
३. राहुल सांकृत्यायन यांचं 'घुमक्कड-शास्त्र'.‌ हे भटकंती बद्दलचं, भटकंतीची जी आदिम मानवी प्रेरणा असते, त्या प्रेरणेचं आहे. हे पुस्तक भटकंतीचं तत्वज्ञान उभं करतं. भटकंतीला एक पवित्र गोष्ट मानतं. आयुष्यभर पत्करलेला धर्म, साधना किंवा व्रत मानतं.
जातिवंत पॅशनेट भटक्या लोकांनी वाचावं. कुणीतरी समानधर्मी भेटल्यावर मन जसं प्रसन्न होतं, तसं होईल.‌ सुरसुरी येईल.‌ भटकंतीकडे निव्वळ टाईमपासच्या पलीकडे जाऊन बघता येईल. त्यातून एक मनोभूमिका निश्चित होईल. या वाटेवर सोबतीला एक तत्वज्ञ-गुरू म्हणून हा लेखक, तसेच आजवरचे अनेक थोर देशी विदेशी अस्सल भटके आपल्यासोबत आहेत, याबद्दल कृतज्ञता वाटेल.
लेखकानं चाळीस वर्षांच्या भटकंतीच्या अनुभवांचा अर्क या १६० पानांच्या पुस्तकात उतरवला आहे. वेगवेगळी प्रकरणं आहेत. उदाहरणार्थ अथातो घुमक्कड जिज्ञासा, जंजाल तोडो, वय, स्वावलंबन, कला, घुमक्कड-धर्म, प्रेम, देशज्ञान, मृत्यूदर्शन, लेखन, निरूद्देश, आठवणी इत्यादी.‌ अशा वेगवेगळ्या अंगांनी 'भटकंती-शास्त्राचा' वेध घेतला आहे. पुढे मागे ऑक्सफर्ड केंब्रिज वगैरेमध्ये भटकंती-शास्त्राचा एखादा कोर्स निघाला तर हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून लावलं जाईल, असा आबाद आशय आहे. मोठं काम आहे.
पहिल्या दर्जाचा 'परिपूर्ण' भटक्या होण्याचे लेखकाचे निकष कठोर, पण मजेशीर आहेत. ते रक्तातच असावं लागतं. भटकंतीचं बीज कुठंतरी आतच असावं लागतं वगैरे. तर लेखकाच्या शास्त्रानुसार पहिल्या दर्जाचा भटक्या होणं कठीणे. आपण कदाचित आठव्या नवव्या दर्जाचा भटक्या होऊ शकू.
पुस्तक माझ्या दुप्पट आयुष्य जगलेलं आहे. जवळपास पंचाहत्तर वर्षांचा टाईम ट्रॅव्हल करून हातात आलंय. ही प्रत देश स्वतंत्र झाला त्या आसपासची आहे.‌ तारखेवर हात फिरवतो, तेव्हा थरारल्यासारखं होतं. तेव्हा नवंकोरं असलेलं हे पुस्तक आज वयोवृद्ध झालंय, पण चांगल्या साहित्याला काही कालमर्यादा नसते. भटकंतीतून मिळणाऱ्या आनंदाची फारशी कल्पना नाही, पण हे वाचताना मिळालेलं सुख मात्र अनुपम होतं.‌
४. काश्मीरबद्दल भरपूर लिहिलं गेलंय. प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात. त्याप्रमाणे आपापल्या सोयीचे निष्कर्ष काढून मोकळे होतात. पण मानव कौल‌ यांची 'रूह' खरोखरंच चांगली कादंबरी आहे. व्यक्तिगत आहे. स्वतःवरचं भूतकाळाचं ओझं उतरवण्याची असोशी आहे. मानव कौल काश्मिरी पंडित आहेत. लहानपणी स्थलांतरित व्हावं लागलं, मग आयडेंटिटी क्रायसिस दीर्घकाळ. त्यातून मग ते तिथे परतून गेले, फिरले, राहिले काही काळ आणि लिहिलं.
यातून काश्मीरचा गंध, काश्मीरियतचा आत्मा स्पर्शिण्याचा प्रयत्न केलाय.‌ आठवणी हृद्य आहेत. माणसानं माणसासाठी लिहावं, हा लेखकाचा धर्म ते सोडत नाहीत. कौल फारच नाजूक तरीही स्थिर हातांनी लिहितात. अवघड सत्यंही हळूवारपणे आणि कल्पकतेनं सांगितली तर अंगावर येत नाहीत, हे त्यांना माहितीय. निर्बुद्ध झुंडींच्या युगात असंही लिहिणारा एकजण आहे, हे आश्वासक आहे.
विनय हर्डीकरांचं 'व्यक्ती आणि व्याप्ती'.! यातले म. द. हातकणंगलेकर, गोविंद तळवलकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यावरचे लेख अप्रतिम. पर्सनल टच असलेली, संतुलित, बहारदार आणि गोळीबंद व्यक्तिचित्रणं. व्यक्तीचित्रणं लिहावीत तर अशी. हर्डीकर आवडले आपल्याला.!
५. सरिता आवाड यांचं 'हमरस्ता नाकारताना' हातातून सोडवत नाही. फार च चांगलं आत्मचरित्र.! लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतीचित्रे'चं मराठी साहित्यात जे स्थान आहे, हे त्याच दर्जाला जाणारं काम आहे.
आईशी, म्हणजे सुमती देवस्थळेंशी, लव्ह-हेट रिलेशनशिप. पीळ दोघींचा खास. आईबापाविषयी, सगळ्यांविषयीच असं माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. समजूतदार, ठाम आत्मविश्वासपूर्ण लिखाण. हा काळाचा दस्तऐवज. सोपी सरळ वाक्यं. पण वाचताना वेगवेगळ्या भावना उमटतात. लेखिकेला चांगलं जगता आलंय. स्वतः जी वाट निवडली, त्यावर चालताना जे भलं बुरं समोर आलं ते सोसताना लेखिका कमी पडलेली नाही. साठाव्या वर्षी लिहिलंय, त्यामुळे एवढी प्रगल्भता आली असावी. वाचून झाल्यावर छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटतंय. लेखिकेने हे लिहून स्वतःचं ओझं कमी केलेलं दिसतंय. ते ओझं आता आपल्यावर आलं.!
व. दि. कुलकर्णींचं 'ज्ञानेश्वरी: एक अपूर्व शांतिकथा'! वदि ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पार बुडालेले आहेत.‌ ओव्या आणि त्यातली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवताना किती बोलू आणि काय बोलू, असं झालंय यांना.! माणसानं प्रेयसीबद्दल बोलावं तसं हे ज्ञानेश्वरी बद्दल बोलतायत.‌ हे म्हणजे हाडाचा शिक्षक आहेत. माठातल्या माठ माणसालाही हे ज्ञानेश्वरीची जादू दाखविल्याशिवाय सोडायचे नाहीत. भारी!!
६. दिलीप माजगावकरांचा 'पत्र आणि मैत्र' पत्र-संग्रह. यात त्यांनी लेखकांना पाठवलेली पत्रं आहेत. माजगावकर एवढं सही लिहितात, माहित नव्हतं.‌ कदाचित ते फक्त राजहंसच्या आतल्या वर्तुळातच माहिती असणार. एवढी वर्षें हा माणूस पडद्यामागं राहून कसल्या कसल्या खिंडी लढवत होता, जेणेकरून चांगली पुस्तकं लोकांपर्यंत यावीत.! चित्रकार सतीश देशपांडेंच्या मुलाला त्यांनी पाठवलेलं पत्र, अस्सल सोनं आहे म्हणजे. विचारसरण्यांवरच्या त्यांच्या कमेंट्स, निरीक्षणं फ्रेश आहेत. चांगली स्वच्छ संपादकीय दृष्टी लाभलीय त्यांना !!
एकूण माजगावकर आदरास पात्र आहेत.! बाकी, सारंग दर्शने समजा संघाचे असले तरी प्रस्तावना चांगली लिहिलीय.‌ आवडली. आणि अंबरिश मिश्रचा लेखही!
७. आनंद करंदीकरांचं 'वैचारिक घुसळण'! एकेक इश्यू, प्रश्न विचारार्थ घेतात आणि तो अनेक अंगांनी निरखून पाहतात. जाम रिसर्च करून लिहितात. चिरेबंदी काम. लिहिण्याचे विषय विपुल रेंजचे आहेत. समकालातले आहेत. एखादा लेख कसा लिहावा, विचार कसा करत जावा, याचे डेमो च सापडतात यात.
आणि नर्मविनोद सहज, ओढूनताणून नाही. बुद्धिमत्तेची चमक.
आणि उपहास वक्रोक्ती ओरिजनल.
आता हे लेख वाचल्यावर अभिजीत वैद्य चं 'शब्दांचीच शस्त्रे' वाचवेना. लिटरेचर इन हरी. राजकीय घडामोडींना तात्काळ दिलेला प्रतिसाद! घडामोडी शिळ्या होऊन गेल्यावर हेही होऊन बसतं.
भावार्थ मधून विजय पाडळकरांचं अकिरो कुरासावा वरचं आणि गुलजार च्या सिनेमांवरचं पुस्तकं आणली, चाळून संपवली. खूप जुने सिनेमे आहेत हे. ठिकठाक आहे. राजीव जोशींचा 'धूपघडी' आवडला नाही. खूप लांब पल्ल्याच्या, दीर्घकविता आहेत. धाप लागते. छोट्या छोट्या ठीक. त्यांचा 'दो पंक्तियों के बीच' चांगलाय.
भारत सासणेंचं 'रक्तातल्या समुद्राचं उधाण'. हृद्य पुस्तक. चांगला वेळ गेला वाचताना. गंभीर चिंतनशील अलवार लिखाण. सासणे पात्राचं आयुष्य उभं करतात. उथळ कमेंट्स करत नाहीत. निरीक्षणं जबरी आहेत. त्यात सहानुभाव आहे. हे असं मूलद्रव्य एखाद्याच्या आतच असलं पायजे. इकडून तिकडून उसनं आणता येत नाही.
८. असीम छाब्रा चं इरफान खान वरचं पुस्तक. एक ऐसा कलाकार जिसकी आंखे अफसाना लिखती है. इरफानचे सिनेमे मुलाखती पुन्हा एकदा बघावेत, यात लिहिलेल्या काही जागा कन्फर्म करायला. पुस्तक चांगलंय. लेखक इरफानचा डाय हार्ड फॅन आहे, हे स्पष्टच आहे. पण शब्दसंपदा कमी पडतेय. ‘याला तोड नाही' हा शब्दप्रयोग वारंवार येतोय. बाकी, इरफानवर जेवढं लिहिलं जाईल तेवढं कमीच आहे. त्याच्यावर भाष्य करायचं म्हणजे तितक्याच तोलामोलाचा कुणीतरी लेखक पाहिजे.
असेच आपल्याकडे गिरीश पांडुरंग कुलकर्णी आहेत.! पूर्वी लोकसत्तेत 'बहरहाल' म्हणून एक इंटेन्स सदर लिहायचे. तेवढ्या एका सदरा साठी रविवारी पेपर घ्यायचो.‌ तर त्यांनी जरा आणखी लिहायचं मनावर घेतलं पाहिजे. भाषेचं भलं होईल. शब्दांची निवड फारच अनवट असते त्यांची.‌ बाकी ते म्हणजे सरळसरळ इंटलेक्चुअलच आहेत. एकदम गहिरं पाणी. मुलाखती आहेत यू ट्यूबवर.‌ बोलायला लागले की चिंतनाचा वनसायडेड प्रपात कोसळत राहतो. आपल्या छोट्या तांब्यात किती भरून घेणार! तर, त्यांनाही आणखी चांगले मुलाखतकार मिळायला हवेत. नाहीतर मग सुमार यूट्यूबर्सचा सुळसुळाट आहेच. काही वाचन नाही, काही आकलन नाही, काही गांभीर्य नाही. पुढचा माणूस कुठल्या लेव्हलवरून बोलतोय, आणि आपण त्याला काय विचारावं, याची समज नाही. समजा कधी साक्षात गौतम बुद्ध समोर येऊन बसले, तरी हे 'तुम्हाला कुकींग येतं का?' विचारतील.! हो ना.. नाहीतर काय.! यांना कोण अडवणार ना!
९. फूटपाथवर जुन्या पुस्तकांचा ढिगारा उपसताना हात धूळीनं माखतात. पण यान मार्टेल चं beatrice and Virgil, सापडलं शंभर रूपैला. कोण कुठलं लंडन आणि कुठलं हाईड पार्क.‌! त्याला तिथं झालेला तो साक्षात्कार इथं बसल्या बसल्या जाणवतो. ही लेखकाची ताकद. या शब्दकळेशी आपण नवखे, तेव्हा जरा काही समजलं की भारी वाटतं. आपलं हे calf love कधी थांबणार.! साला सुरूवात एवढी चांगली केली होती पण नंतर ट्रॅक सुटला, फाफलला यान मार्टेल. मध्येच हे पानंच्या पानं भरून नाटक, फ्लॉबेर, प्राणीसंग्रहालय वगैरे कशासाठी लिहिलंय?
१०. ट्रेवर नोआ चं 'बॉर्न अ क्राईम'. डार्क ह्युमर आहे. चांगलं पुस्तक. चांगला अनुवाद. बारावीतल्या मुलीनं हा मराठी अनुवाद केलाय.! आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय समाजरचेनेचे अंतरंग. झोपडपट्टीतलं अर्थशास्त्र, तुरूंग, डिस्क्रिमिनेशन. लहानपण, भूक. प्रेमप्रकरणं. काळा बाजार. पोलिस. वर्णभेदी टिपण्या. पूर्वग्रहदूषित नजरा. ऐन तारुण्यात या सगळ्याकडे एवढं तटस्थपणे बघायला कसं जमत असेल! हे सगळं झेलत हा विख्यात स्टॅण्ड अप कॉमेडीयन होऊन बसलाय. स्ट्रगल खतरनाक आहे. आपल्या सारख्याला याचं वारंही झेपणार नाही. आपण म्हणतो की फक्त आपल्याकडेच हे क्रूर प्रकार चालतात. नाही, माणसं सगळीकडे सारखीच वेडझवी असतात.‌

'कुब्र.'

 'कुब्र' म्हणजे निबिड, अनाघ्रात अरण्य. हे पुस्तक अशा अरण्याचं आहे. काळवेळाचे साखळदंड विसरून, दीर्घ काळ अरण्यात राहून, निर्भार रेंगाळून झाल्यावर मनात जे समृद्ध अरण्य कायमचं वस्तीला येतं, हे त्यावर लिहिलेलं पुस्तक आहे.

लेखकाच्या ठायी तत्त्वचिंतक, संशोधक आणि कवी अशा तीन वृत्तींचा दुर्लभ संगम झालेला आहे. जे दिसलं, जे अनुभवलं ते सगळंच्या सगळं टिपता येणं हेच मुळात दुष्कर. आणि पुन्हा ते सगळं जसंच्या तसं इतरांपर्यंत पोहचवणं, हे त्याहून कठीण. त्यासाठी जी जादुई प्रतिभा लागते, ती या लेखकावर मेहेरबान झाली आहे.

या पानांमधून प्रवास करत, आपण त्या कुब्र च्या गाभ्यात, त्या निबिड अरण्यात दाखल होतो, डुबून जातो. हरवतो. लेखकानं टिपलेली अरण्याची घनगंभीर स्पंदनं टिपत राहतो स्तब्ध.

हे काही एका दमात वाचून सुटका करून घेण्यासारखं नाही. श्वासात भिनत जाणारं लिखाण आहे हे. म्हटलं तर फार फार बारकाईनं केलेलं काम आहे. म्हटलं तर व्यासांसारखं महाकाव्य आहे.

यातली कुठलीही नोंद वाचायला घ्यावी, मनाची अवस्था बदलून जाते. जीवनाच्या जाणिवेची संथ अंतर्धारा वाहते ओळींतून. कान देऊन ऐकत रहावी. ओळींतून मन झिरपतं. स्वतःला गाळून घेतं. हिणकस वरती राहतं. निखळ अस्तित्वाचं भान खाली उतरतं. असा हा मग्न, आत्मस्थित ऋषी, अरण्य उपनिषद लिहितो.!!
अफाट पसारा आहे. कसं न्याहाळायचं हे कोडं? कशी आणावी दृष्टी? कुतूहल आहे.!
एकेक घटना घडत आहेत. घटना सुट्या सुट्या नाहीत. त्यामागे एकसलग जैवसाखळी आहे. कार्यकारण भाव आहे. स्वतःची अशी नैसर्गिक लय आहे. मृतदेहांचं विघटन होतंय. मगरीकडून सावज टिपलं जातंय. अजगर चितळ गिळतंय. रानकुत्र्यांची झुंड हरणास घेरतेय. एकेक चित्तथरारक नाट्यं.! वाचताना श्वास अडकतोय. एकेक घटना घडत आहेत!

क्रोर्य, करूणा, भय, व्याकुळता, शहाणीव यांची हलती क्षणचित्रं सरकतात डोळ्यांसमोरून. आणि या सर्वांप्रती लेखकाचा विलक्षण साक्षीभाव! यानं स्वतःभोवती अरण्याची दुलई पांघरलेली आहे, अरण्याची लय-कंपनं याच्यात झिरपली आहेत. हा अरण्यात विरघळून गेलाय, स्वतःचं अस्तित्व जाणवू देत नाही. वाचकांनी आपापल्या पंचेद्रियांनी हा अनुपम सोहळा अनुभववावा. याच्या लिहित्या बोटांना अद्भुताचा स्पर्श झालेला आहे.!

अरण्यातलं ऋतूचक्र सूक्ष्म गतीनं बदलताना पाहतोय.‌ ऋतूंचे सांधे बदलताना पाहतोय. त्याचे जीवसृष्टीवर होणारे परिणाम पाहतोय. लय-विलयाचं अनादि अनंत चक्र पाहतोय. हा फक्त पाहतोय. जे जसं घडतंय तसं पाहतोय. त्याला स्वतःची टिप्पणी जोडत नाही. पण एक आख्खी कादंबरी लिहून जे सांगता आलं नसतं, ते जीवनाचं समग्र नाट्य हा फक्त एका नोंदीमध्ये रचतोय. त्या क्षणबिंदूंचं संचित, त्यांचा अर्क आपल्यापुढे ठेवतोय. हा फक्त पाहतोय.!

याचा इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद होणं आवश्यक आहे. हे इतर भाषांमध्ये पोहचणं आवश्यक आहे.‌ कारण हे सगळं फार वैश्विक आहे. अर्थात, ही गूढ अरण्यलिपी वाचण्यासाठी लेखकानं स्वतःची जी धाराप्रवाह आरस्पानी मराठी घडवलेली आहे, तिचा अनुवाद करणं काही सोपं असणार नाही.



Monday, 26 August 2024

काही नोंदी

 १. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याजवळचं, 'भावार्थ.. पुस्तकं आणि बरंच काही' नावाचं दुकान. कलेक्शन आणि विषयांची, लेखकांची रेंज चांगलीय. एकाच शेल्फच्या एका कप्प्यात सेम पुस्तकाच्या थप्प्याच्या थप्प्या रचलेल्या दिसत नाहीत. काही दुकानांमध्ये एकेका लेखकाला/लेखिकेला एकेक कप्पा ॲलॉट केलेला दिसतो. इथं तसं नाही‌. दोन विरूद्ध टोकाचे लेखकही इंटरेस्टिंगली शेजारी शेजारी दिसू शकतात.‌ दरवाजा ढकलून आत गेल्यावर बाहेरची दुनिया कटऑफ. समोर सदोदित वाहणारं ट्रॅफिक आहे, पण आत किंचितही आवाज जाणवत नाही. खिडक्यांच्या काचांतून झिरपत आत येऊन शालीनपणे पसरणारा नैसर्गिक उजेड. वाचनासाठी कंफर्टेबल डिफ्यूज्ड लाईट्स. एकूणच ॲंबियन्स, ध्वनी-प्रकाश संयोजन-रचना-पोत, या सगळ्यांमागे कुणीतरी शहाणा माणूस असावा. कधीतरी अर्धा-एक तास रेंगाळून जाण्यासाठी चांगली जागा आहे.
. पाऊस रिमझिम दिवसभर.‌ अशा संध्याकाळी शांत बसून चहा पिण्यासाठी फर्ग्युसनचं कॅन्टीन ही चांगली जागा आहे.‌ चहापण चांगलाय. कमी गोड, आलं घातलेला. मॅनेजमेंट संघाचं असलं तरी चहा चांगलाय. समोर पावसामुळं आरशासारखी स्वच्छ झालेली झाडं. न्हाऊ माखू घातलेल्या ब्रिटिशकालीन देखण्या इमारती. अशी जागा जुन्या शैक्षणिक कॅंपसमध्येच असू शकते. कसलं डीप वाटतं पाऊस बघत गाणी ऐकताना. असं नेहमीच वाटणार असेल तर आयुष्यभर इथंच बसून रहायला हरकत नाही. पण कधीतरी सगळे निघून गेल्यावर त्यांनी एकेक लाईट्स बंद केल्या. मग उठून हळूहळू त्या इमारतींच्या मधून चालत चालत बाहेर पडलो. काहीतरी बरं लिहिलं पाहिजे, असं वाटतं. पण हे असे जगण्याबद्दल रोज थोडे थोडे निष्कर्ष काढणं नको. संपूर्ण जगून झाल्यावर मरतानाच्या क्षणी एकदाच काय ते निष्कर्ष काढायला पाहिजेत. म्हणजे मग ते बदलणार नाहीत. किंवा बदलायची वेळ येणार नाही. किंवा बदलायचा चान्सच मिळणार नाही.
. जोडून सुट्ट्या आल्या की शहरांतून बाहेर पडण्यासाठी वाहनांच्या, बसेसच्या, व्हॉल्वोजच्या रांगा पसरतात सर्वदूर.
परंतु काळजीचं काही कारण नाही. वीसेक वर्षांत हा प्रश्नही भगवानभरोसे आपोआप मिटून जाईल. तेव्हा सगळी गावं, शहरं, निमशहरं, महानगरं एकमेकांमध्ये घुसून कायमची हरवून गेलेली असतील. मुंबई पुणे नाशिक नगर औरंगाबाद सोलापूर सातारा सांगली कराड कोल्हापूर यांचा मिळून एक महाकाय अफाट मानवी समुद्र पसरलेला असेल सगळीकडे. झंझटच खतम.
. डॉ. गणेश देवींचं 'वानप्रस्थ' वाचलं. मनातली खळबळ शांत करणारं पुस्तक आहे. रोजच्या तक्रारी असतातच, अमुक झालं, तमुक झालं. पण काही पुस्तकं सगळं विसरायला लावतात. भाषेचं-काळाचं भान, गांभीर्य, समजूत देतात. 'वानप्रस्थ' त्यापैकी एक.
डॉ. देवी मोठे भाषातज्ज्ञ, विचारवंत आहेत. कृतिप्रवण विचारवंत आहेत.‌ नुसतं लिहून बोलून थांबत नाहीत. जबाबदारी मानतात स्वतःची. तेजगढची आदिवासी अकादमी, भाषा रिसर्च सेंटर सारखी मोठी टिकाऊ कामं उभी केलीयत. शिवाय भाषांचं लोकसर्वेक्षण, दक्षिणायन चळवळ आणि काय काय करतात हे. कुठून एवढी ऊर्जा, आत्मबळ आणतात या वयात? त्रास लिहितानाही किंचाळणं नाही, आक्रोश नाही. काही आकस नाही कुणाविषयी. एकप्रकारची सर्जनशील निवृत्ती दिसते. नेहमी अशी सुजनतेची भाषा बोलायला कसं काय जमत असेल? हे म्हणजे एखाद्या ऋषी सारखंच झालं. आपण काही गांधींच्या काळात जन्मलो नाही, त्यांना बघू शकलो नाही. हरकत नाही. गणेश देवी तर आहेत या काळात.
डॉ. देवींच्या पुस्तकांच्या प्रभावाखाली आल्यानंतर, त्यांची यूट्यूब वरची व्याख्यानं, मुलाखती ऐकण्याचा सपाटा चालू झाला. प्रचंड वाचन चिंतन करणाऱ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत असेल अशी डूब. आणि स्वतःचे स्वतंत्र भविष्यवेधी विचार. ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं कौशल्य. पाच मिनिटांत विषयाच्या गाभ्याला हात घालतात, बुडून जातात. भविष्याबद्दल इंटेन्स बोलतात. तळमळीनं बोलतात, पण हट्टाग्रह जराही नाही. 'हे असं असं आहे, हे असं असं पुढं होण्याचा धोका आहे. विचार करा.' एवढंच म्हणणं.
अवाक् होऊन ऐकत रहावं, असा एकेक प्रकार. जेव्हा ते बोलायचं थांबतात, तेव्हा नुकतंच जे ऐकलंय ते मनाशी घोळवत असताना, मनात फक्त आदराची भावना उरते. भाषांचा अभ्यास करता करताच देवी सर एवढे शांत झाले असावेत. आणि शब्द किती संयतपणे वापरतात यार हे.! त्यांची ती संथ लयीतली भाषा ऐकल्यावर इतर कुठला कर्कश आवाज ऐकूच वाटत नाही.‌ त्यांच्या प्रभावामुळे आजकाल आपल्याही भाषेत थोडासा बदल जाणवतोय. हे चांगलंय म्हणजे.
. बरीच रात्र झाल्यावर कृष्ण बलदेव वैदचं 'उसका बचपन' वाचायला घेतलं. वैदनी चांगलाच दणका दिला. एवढं कातिल पुस्तक आपल्याकडे बरेच महिने न वाचता पडून होतं याचा पश्चात्ताप.!
झपाझप वाचत राहिलो. त्यातला तो बीरू नावाचा मुलगा. त्याचं लहानपण. बीरूचा बाप जुगार खेळतानाचा एक प्रसंग. आणि त्याला त्याचा शिक्षक मारत असतो तो एक प्रसंग..! कहर लिहिलंय. एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखं. ऑक्टोपस सारखे दहा दहा हात आहेत याला. जखडतोच डायरेक्ट. तर मग रात्रभर जागरण. आणि मग आज सकाळभर काल वाचलेल्या प्रसंगांचे पडसाद. हिंदी वाचून वाचून आपल्याला स्वप्नंपण हिंदीतनंच पडायला लागलीत आता. ही एक वेगळीच भानगड झाली च्यायला.
६. सलग कृष्ण बलदेव वैद वाचल्यावर निर्मल वर्मा, मानव कौल नको वाटतात. फार कीस काढतात ते. तेच नेहमीचं एकांताचं भावुक कोमल तत्वज्ञान.‌ शहरी किंवा तत्सम युरोपियन धर्तीचं लिखाण. एकलकोंडं. जीवनाचा अभाव असलेलं. ढग, पाऊस, झाडं यांची वर्णनं फार.! कॅफेत, डोंगरात, लॉजमध्ये, बारमध्ये बसून आजूबाजूला बघत वर्णनं करत बसतात. यांच्याकडे लिहायला दुसरं काही नाहीये काय? समाज, समूह येतच नाहीत यांच्या लिहिण्यात. हे ती क्षमताच हरवून बसलेत की काय?
संवादही फक्त दोन माणसांतले. नाहीतर मग मनातल्या मनात काय वाटतं ते विस्तारानं आळवत राहतात. कधीकधी एखादं विलक्षण वाक्य लिहितात, पण त्याआधी आव खूप आणतात. लेखक असणं म्हणजे कायतरी पवित्र असल्याचा आव.! मी असं लिहितो न् मी तसं लिहितो वगैरे.! यांना स्वतःचा असा समाज, जात-बित काही नाही. हे सेलिब्रिटींसारखे जगभर फिरतात ऐशमध्ये. यांचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत. समाज, देश, विचारसरणी कशाचं काही नाही यांना. हे अधूनमधून बरं वाटतं. पण सदैव नाही. रिपल्शन यायला लागतं मग वाचताना. लेखक असा एवढा समाजापासून तुटून चालत नाही. फार काही भारी अवस्था नाही ती..! नेमाडे, पठारे, मनोहर श्याम जोशी, ग्यान चतुर्वेदी, मीतर सेन मीत बरे.! ते कादंबरीत सगळं जग, वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या बोली, आवाज, खटकेदार संवाद, सगळी किलबिल, सगळा कोलाहल, सगळी गजबज घेऊन येतात. अर्थात त्यांचा लिहिण्याचा काळही वेगळा होता, हे एक आहेच.
७. तहसीन युचेलचं ‘स्कायस्क्रेपर्स’ हे तुर्की अनुवादित पुस्तक पुस्तकपेठेतून आणलं. अनुवाद बकवास आहे. उरकायचं म्हणून उरकलेलंय. इंग्रजी वाक्यं जशीच्या तशी उचलून मराठीत आणलीयेत. त्यामुळे अर्थ लावायला वाक्य पुन्हा वाचावं लागतं. मध्येमध्ये हे असे स्पीड ब्रेकर लागतात. लिंक तुटते.‌ एवढ्या खराब अनुवादाऐवजी सरळ इंग्रजीच वाचलं असतं. छापण्यापूर्वी सगळं पुन्हा एकदा वाचून बघायलं हवं होतं त्यांनी.
संपादन नावाची काही गोष्ट असते की नाही? साडेचारशे रूपै वाया गेले..!
अक्षरधारा च्या प्रदर्शनातून त्र्य. वि. सरदेशमुखांवरचं 'जवळिकीची सरोवरे' आणलं. एवढं काही खास नाही. समीक्षात्मक टिपणं आणि जुन्या मराठी कवी/लेखकांबद्दलची मतं आहेत. भाषा अलंकृत आहे.‌ असलं आता वाचवत नाही. अत्रे, माटे, फडके, खांडेकर, श्रीपु, बालकवी, मर्ढेकर वगैरे नावं बघितली तरी डोकं उठतं. बाकी, सरदेशमुखांचं 'डांगोरा एका नगरीचा' मात्र फारच चांगलं आहे.
. GandhiServe' वर महात्मा गांधींच्या भाषणांचे रेकॉर्डिंग्ज आहेत. ऐन दंगलींच्या काळात प्रार्थना सभांमधली गांधींची भाषणं. निर्वासितांच्या छावण्या, रडणारी लहान बाळं, स्त्रिया. सगळा आकांत. गांधींची समजावणीची भाषा. सांत्वनाचे हळूवार शब्द. देवाचा आवाज..!! 'मला तुमच्यासोबत जिवंत रहायचं आहे', म्हणतायत गांधी. रडू येतं.
अशा भयाण वणव्यात डोकं ताळ्यावर ठेवणं हेच मुळात कठीण. शांतपणे विचार करणं त्याहून कठीण. वातावरण निवळण्यासाठी लोकांमध्ये उतरण्यात जीवाचा धोका. गोष्टी बिघडवायला काही कष्ट लागत नाहीत, जोडायला लागतात. दंगली थांबवल्या या माणसानं कलकत्त्यात. त्यातनं ज्या निष्पापांचे जीव वाचले असतील, त्यांना जाऊन विचारा म्हणावं गांधी काय होते.!
. पंधरा ऑगस्ट. चुकून एक शाळा. तिथं चाललेलं झेंडावंदन.‌
शाळेतली मुलं-मुली 'सारे जहाँ से अच्छा' म्हणतायत. त्यांचा तो प्रार्थनेसारखा घुमणारा स्वर. अनेकांच्या कंठांतून एकाच वेळी निघणाऱ्या आवाजांची हार्मनी. हे गाणं तसंही एकट्याने/एकटीने गाण्याचं नाहीचे, समुहगान आहे. शतकातून एखाद्या गाण्याच्या पदरी असं भाग्य येतं की आख्खा देश त्याला आपलं गाणं म्हणून उचलून धरतो, पिढ्यानपिढ्या गात राहतो. कारण त्या ओळीच तशा आहेत.
ऐ आब-रूद-ए-गंगा वो दिन है याद तुझ को,
उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा
कवी इक्बाल त्या सर्वसाक्षी गंगेला विचारतायत की तुला आठवतोय का तो दिवस? जेव्हा हजारो वर्षांपूर्वी कधीतरी आमचे पूर्वज तुझ्या काठावर रहिवसले होते??
अंगावर काटा वगैरे..!

Tuesday, 9 April 2024

काही वाचननोंदी

 १. आधी माझ्याकडे पेंडींग पुस्तकं नसायची. लायब्ररीतून आणायचो, वाचून झाली की परत दुसरी आणायचो.‌ पण मग हळूहळू हावरटासारखा स्टॉक करायच्या मागं लागलो. दिसलं, चांगलं वाटलं की आणायचं. वाट बघायला नको, हक्काचं आपल्याजवळ असलं की हवं तेव्हा वाचू शकतो, हे समर्थन.‌

अशी काही पुस्तकं दरवेळी खरेदी करून आणून ठेवायची. त्यावर नाव-तारीख टाकायची.‌ मग जरा निवांत बसून ती सगळी चाळून बघायची. त्यातलं जे पुस्तक पटकन स्वतःत ओढून घेतं, ते चालू करायचं. बाकीची तशीच निम्मी अर्धी वाचून टेबलवर पडून राहतात, उरलेला भाग जरा नंतर वाचता येतील म्हणून. पण तेवढ्यात आणखी पुढचा स्टॉक येतो. किंवा मधल्या काळात कुणीतरी नवीन लेखक/ लेखिका सापडलेली असते. मग त्यातलीही दोन-तीनच आरपार संपतात.‌ बाकी तशीच.

काही पुस्तकं तर 'नंतर वाचू नंतर वाचू' म्हणत त्या ढिगाऱ्याच्या अगदी तळाशी गेलेली असतात. मग जरा सहा महिन्यांतून एकदा बसून त्यातल्या काही पुस्तकांना टाटा बाय बाय करतो.
मध्यंतरी मी विचारसरणीच्या अंगानं काही पुस्तकं/ कादंबऱ्या वाचत होतो.‌ तर मग तशा पुस्तकांचा खूप स्टॉक होत गेला. मग एकाच विचारसरणीच्या अंगाचं सलग वाचत राहिलं की सगळ्या जगाकडे आपण त्याच दृष्टीकोनातून बघायला लागतो. त्यात काही लिखाण तर एवढं मॅनिप्युलेटीव्ह असतं की सगळं भयावह वाटायला लागतं. डोकं तापतं. कालांतराने बघितलं की कळतं ते काय फार ग्रेट नव्हतं.
मग अशी काही पुस्तकं वर्षभरानंतर नको वाटायला लागलेली असतात.‌ कारण आपणही मधल्या काळात बदललेलो असतो. तर मग त्याही पुस्तकांना निरोप.
आता काही दिवस कायतरी लाईट लाईट वाचायला पायजे.
वैचारिक संघर्ष असलेलं काही वाचायला नको. आपण ट्रिगर होतो. कुठल्याही समाजात वैचारिक लोकं नेहमीच अल्पसंख्याक असणार. एका बाजूला झोंबी, तर दुसऱ्या बाजूला फ्रस्ट्रेटेड. दोहोंच्या मध्ये अथांग पसरलेला मिडलक्लास क्राऊड. त्या बल्क पब्लिकला आपापल्या बाजूनं खेचायची चढाओढ चाललेली. ह्या भांडणात आपण कुदायचं कारण नाही.


. शिवाय वर्षानुवर्षांचा ऑलरेडी सेटल झालेला स्टॉक असतो, त्यातल्या पुन्हा वाचावंसं वाटणार नाही, अशा काही पुस्तकांना निरोप. त्यासाठी निकष एकच, ज्या पुस्तकांत पूर्वी आपण भरपूर भरपूर खुणा करून ठेवलेल्या असतात, ती ठेवायची. ज्यात त्या मानाने कमी खुणा केलेल्या असतात ती काढून टाकायची.

आणून ठेवलेली पुस्तकं आणि त्यातली वाचून संपवलेली पुस्तकं, यातलं प्रमाण गंडत चाललेलं आहे. म्हणजे हावऱ्यासारखी उचलून आणायची पुस्तकं आणि पुन्हा ती विसरून तिसरंच काहीतरी वाचत बसायचं. पुन्हा काही नवीन दिसली की आणायची आणि आधीची विसरून ती वाचत बसायचं. अशानं सगळं गणित बिघडतं. थोडीतरी शिस्त पाहिजेच.


. अलीकडे हिंदीमध्ये मिथिलेश प्रियदर्शीचं 'लोहे का बक्सा और बंदुक', शशिभूषण द्विवेदीचं 'कहीं कुछ नहीं'', अविनाश मिश्र यांचं 'नये शेखर की जीवनी', चंदन पांडेय यांचं 'वैधानिक गल्प', पुरूषोत्तम अग्रवाल यांचं 'नाकोहस';
तसंच मराठीमध्ये मृद्गंधा दिक्षित यांचं 'करुणापटो', संग्राम गायकवाड यांचं 'मनसमझावन' अशी काही पुस्तके आली आहेत. ह्या लेखकांनी आपापल्या पुस्तकांत वैचारिक लाईन मांडण्यासाठी जे प्रयोग केले आहेत, ज्या अफलातून स्ट्रटेजी वापरल्या आहेत, त्यामुळे ही पुस्तकं अतिशय सरस वाटली.
वैचारिक कादंबऱ्या लिहिताना लेखकांनी मन थोडं विशाल केलं पाहिजे, विरूद्ध विचारालापण स्थान दिलं पाहिजे. कारण ते एक उमद्या लेखकाचं लक्षण आहे.‌
पण सध्याच्या काळात ती फक्त आशाच आहे. कारण शीर्षकंच एवढी भडक असतात, टारगेटेड वाचकांसाठी असतात, अंतिम सत्य गवसल्याच्या घोषणेसारखी असतात की आत काय आनंदीआनंद असणाराय हे कळतंच म्हणजे.‌ (उदाहरणार्थ हे शीर्षक कसं वाटतंय बघा : 'जगाला पोखरणारी डावी वाळवी')

. ऐश्वर्या रेवडकर यांची 'विहिरीची मुलगी' वाचली.
फाफटपसारा फार आहे. 'सांगणं' खूप आहे, आणि 'दाखवणं' कमी. वानगीदाखल सांगायचं झालं तर ही एक ओळ- 'आम्ही खूप वैचारिक वाद घातला'
तर त्या पात्रांनी जो वैचारिक वाद घातलेला आहे तो सरळ तिथं लिहायला पाहिजे होता. 'वाद घातला' हे सांगणं झालं. तो वाद तिथं लिहिणं हे 'दाखवणं' झालं.

सांगायला लागली की सांगतच राहते. थांबतच नाही. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगते. कादंबरीचा कच्चा आराखडा एखाद्या चांगल्या जाणकाराच्या नजरेखालून गेला असता, तर ह्यातला तीसेक टक्के मजकूर परस्पर वगळला गेला असता.

सध्या विशीत असणाऱ्या दोन मैत्रिणी ज्या भाषेत संवाद साधतात, ती भाषा लेखिकेनं ऐकलेली नसावी की काय अशी शंका येते. फडके-खांडेकरांच्या काळातली आणि दवणे-वपुंच्या काळात वाचकांनी नाईलाजाने गोड मानून घेतलेली पुस्तकी भाषा, २०२४ साली पुन्हा पुस्तकात आणण्याचं प्रयोजन समजलं नाही.‌ शब्दांच्या फुलोऱ्याचा सोस खूप. जे एका ओळीत सांगून विषय मिटवता आला असता तिथं दीड पान खर्च झालंय.
बाकी मग 'प्रेम हे असं असतं न् आयुष्य हे तसं असतं', 'डोळे डबडबणे', 'अत्यानंद होणे', 'कळी खुलणे', 'सुस्कारा सोडणे' वगैरे सगळं आहेच म्हणजे. आणि कळी तरी किती वेळा खुलणार ना म्हणजे?

ह्यात जे मीरा नावाचं मुख्य पात्र आहे तिचे प्रियकर, मित्र, मैत्रिणी भुईवर घट्ट उभेच राहत नाहीत. पात्रांचं जरा आणखी डिटेलिंग पायजे होतं. काही प्रसंग कृत्रिम, फिल्मी वाटतात. शिवाय यातले आईबापही बडबड फार करतात. आया तर पत्रं पाठवून बडबड करतात. आत्मशोधाच्या नावाखाली ब्लॉग मधले काही पॅराग्राफ येतात अध्ये मध्ये. अस्थानी वाटले. त्यातून कसलाही अर्थ लागला नाही. आणि कसलाही भाव मनात उमटला नाही.
कुणी म्हणेल अशी नकारात्मक शेरेबाजी करणं योग्य नाही.‌
अहो, मग तसं लिहू नका ना.
लेखिका स्वतः चांगल्या ॲकॅडमिक बॅकग्राऊंडची डॉक्टरीण आहे. चांगलं सामाजिक काम आहे त्यांचं‌. त्याबद्दल आदर आहे. परंतु ह्यात लिहिताना स्वतःतील डॉक्टरीणीचा प्रभाव जरा जास्तच पडलेलाय. स्त्रियांच्या लैंगिक, मानसिक किंवा आरोग्यविषयक वैद्यकीय माहिती/प्रबोधन/काऊन्सेलिंग हे सगळं पात्रांच्या तोंडून 'डंप' केलेलंय. ती माहिती चांगलीय. पण हे कादंबरीत लिहिण्याऐवजी पेपरमध्ये लेखमालिका लिहिली असती तर जास्त स्त्रियांपर्यंत ती माहिती पोचली असती.‌ समस्त स्त्रीजातीला शहाणं/सावध करून सोडणं, हा काय कादंबरीचा उद्देश असू नाही.
यावर कुणी म्हणेल, 'छे छे तुला बायकांचं मन कळत नाही.‌'
बरोबर आहे. नाही कळत. पण कळून घ्यायचं कुतुहल आहे म्हणून तर वाचतो ना.‌ तर तुम्हीही ते सांगा जे मला माहिती नाहीये. आणि भाषा जरा 'आज वाचणाऱ्यांना' रिलेट होईलशी वापरा प्लीज. सॉरी. हे सगळं जरा जास्तच हार्श झालं बहुतेक. एवढीही काही खराब नसेल कादंबरी. वाचताना मूड चांगला नसला की हे असं होत असावं.!


. निर्मल वर्मा निःसंशय थोर लेखक आहेत.
वे दिन. अंतिम अरण्य. एक चिथडा सुख. काला कौआ और पानी.‌

मला जे वाटतं ते त्यांना आधीच वाटून गेलेलं आहे. आणि ते शांतपणे लिहिलंय, जसं लिहायला पाहिजे. आक्रस्ताळेपणा नाही. आग्रह नाही.‌ आव नाही. राग नाही. चीडचीड नाही. जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार.‌ एकटेपणा.‌ फार तर दुकटेपणा.‌ तोही मिश्किल. विचारसरणी नाही.‌ पूर्वग्रह नाही. देश नाही. देशभक्ती नाही. घर नाही. संस्कृती नाही.‌ निरा मोकळा सडा माणूस.
माणसानं माणसासाठी लिहावं. निरर्थकतेची चित्रं लिहावी. आणि हे कुठंतरी विदेशात घडलेलंय.‌ पन्नास वर्षांपूर्वी.
तर पुढच्या पिढीतल्या वाचणाऱ्यासाठी लिहावं. त्यांना सांगावं आज आत्ता इथं माझं काय होत होतं. जगण्याचा एवढा किस कसा काय काढलाय ह्यांनी.‌ निवांत सवड कशी मिळाली ? कोण कुठला हा लेखक. माझ्या वाट्याचा विचार तोच करून मोकळा झालाय. त्याचे विचार मला आज लागू पडतायत. आवडतायत. भिडतायत. म्हणजे ह्या सगळ्यातून तोपण गेलेला असणार.

प्राग, व्हिएन्ना, लंडन, बुडापेस्ट, सिमला.. लोक‌ युरोपातले महिनोन्महिने फिरत राहतात. आर्ट गॅलरी, चर्च, कलांचा आस्वाद, फिल्म्स पेंटींग संगीत दारू पब्ज वगैरे.‌ इथं साला जॉब सत्तर टक्के आयुष्य शोषून घेतो‌. मान वर काढायला फुरसत देत नाही. एकाच काळात किती वेगवगळी जगं असतात.
वाचताना एखादं चांगलं वाक्य डोळ्यांपुढे आलं की लगेच ते जगजाहीर करावंसं वाटणं, सगळ्यांना सांगावं वाटणं, हा बालिशपणा आहे. आपण आता तो बंद करायला पाहिजे.
त्यापेक्षा एक चॅप्टर वाचून पानांत बोट ठेवून पुस्तक छातीवर ठेवावं. वाचलेलं मुरू द्यावं. घोळवावं. हे बरंय.


. ओरहान पामुक या इस्तंबूल च्या लेखकाची 'दि रेड हेअर्ड वुमन'. धुक्यातनं वाट काढत जाणारी कादंबरी. हुकुमशाही तिकडेही आहेच.
हंकन गुंदे ची 'एक होता गाझा'. मानवी तस्करी बद्दल.
मनाची युद्धभूमी झालेलीय. एकाच काळात सात ते आठ जागतिक दर्जाचे लेखक/लेखिका तुर्कस्तानात अस्तित्वात आहेत. तुर्की वाचकांची चैन आहे.


. मनस्वीनी लता रवींद्र आणि शिल्पा कांबळे या दोघींच्या 'मुक्त शब्द' मधल्या कथा वाचल्या. ह्यातल्या स्त्री नायिका धर्मांध दाखवल्यात. ही स्ट्रॅटेजी दिसतेय. मुद्दाम वाकड्यात शिरून सगळं डार्क करून दाखवायचं. आणि वाचणाऱ्याला लाज आणायची. इलाज नाही. या वातावरणात डायरेक्ट ॲटॅक करून काय उपयोगाचं नाही. लिहायचं तर अशाच कायतरी नवीन वाटा शोधल्या पाहिजेत.

मानव कौलची 'तितली'. मृत्यूवर कसलं भारी लिहिलंय ह्यानं. रात्री दीड-दोन वाजता सगळी सामसूम असते, तेव्हा वाचायला हे काढून ठेवलं पाहिजे.
मानव कौलचा 'ठिक तुम्हारे पीछे' हा त्याचा सगळ्यात चांगला कथासंग्रह. तो आवडला म्हणून इतर काही पुस्तकं आणली. आणि ती तीन वेगवेगळ्या महिन्यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वाचायचा प्रयत्न करून बघितला. आणि शेवटी एवढी काही खास नाहीत असा निष्कर्ष काढला.‌

डॉ. जयसिंगराव पवारांनी संपादित केलेला 'राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ'. हे फार मोठं काम आहे. राजर्षींबद्दल जे काही संदर्भ पाहिजे असतील ते सगळे एका जागी मिळतात. तात्कालीन पत्रं, दुर्मिळ फोटोग्राफ्स, कागदपत्रं, वर्तमानपत्रांतली कात्रणं, दरबारचे आदेश, भाषणं, अहवाल, आठवणी, सगळ्या लेखांचं संकलन. सगळं सणसणीत काम आहे म्हणजे. लोकराजा च्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं. आवडलं आपल्याला.


. ग्यान चतुर्वेदी लहान मुलासारखं निर्मळ, प्रांजळ हसतात.‌ ह्या वयात एवढा आनंदी कसा काय राहू शकतो हा माणूस?
काशीनाथ सिंह यांचं 'याद हो कि न याद हो' हे संस्मरण. समकालीन लेखक, कवींबद्दल अतिशय हृद्य लिखाण आहे. मराठीत 'असं' चांगलं संस्मरण अजूनतरी वाचनात आलं नाही.
आशुतोष भारद्वाजचं 'मृत्यूकथा: नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम'.
नक्षलवादावरचं आजवर वाचलेलं सगळ्यात उत्तम पुस्तक.‌
उत्तुंग लेखनप्रतिभेची झलक. सर्जनशील कादंबरी प्लस वेगवान रिपोर्ताज, असं कॉम्बिनेशन. गुंतवून ठेवणारं, भयाण अस्वस्थ करणारं.‌ एका इश्यूचे एवढे विविध पैलू. तेही कुणाचीही बाजू न घेता. ग्रेट.
शिवाय, ह्या लेखकामुळं हिंदीतला कृष्ण बलदेव वैद हा आणखी एक टोलेजंग लेखक माहिती झाला. सध्या त्याचं फक्त 'माया लोक' मिळवलंय. तर हा एक लेखक संपूर्ण मिळवून वाचावा लागेलसं दिसतंय.

भकास तारूण्याबद्दलची पुस्तकं खूप येत आहेत. प्रदीप कोकरेचं 'खोल खोल दुष्काळ डोळे' हे एक. शिव्या खूप आहेत. अप्रासंगिक वाटतात. आणि नुसत्या शिव्या लिहून काय होतं? हे असलं तर माझ्यासारखेपण लिहू शकतात. बाकी, ह्यातली नेमाडे आणि तुकारामांबद्दलची निरीक्षणं आवडली.

गवसलेलं पान

साल अमुक अमुक. महिना तमुक तमुक. स्थळ पुणेच.‌ आणि शक्यता बहुतेक कॅन्सरची. एक महिना वाट बघितली. पण एक विशिष्ट लक्षण कमी होत नव्हतं. वाटलं, एवढ्यातच आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालं की काय?

मग येतं वागण्या-बोलण्यात विलक्षण परिवर्तन. एरव्ही आपण कितीही आव आणत असलो तरी मृत्यूची भीती ही सगळ्यात प्रायमल भीती. ती खतरनाक ट्रान्सफॉर्म करते माणसाला. भलेभले गळाठतात, आपण काय चीज?
महिनाभर इंटरनेटवर शोधाशोध करण्यात, मनाची समजूत काढण्यात वेळ काढला.
आवराआवर निरवानिरव कशी करायची ह्याचे अतिरंजित आडाखे बॅकमाईंडला. ते तसेही काही सुचू देत नसतात. शिवाय वरवर सगळं नॉर्मल आहेसं दाखवणं भाग.

मग म्हटलं की असं टांगलेल्या मनस्थितीत राहण्यात काही अर्थ नाही. जे काही आहे ते कन्फर्म करू.
एका डॉक्टरला गाठलं. बोललो की अशी अशी पार्श्वभूमी आहे, अशी अशी स्थिती आहे, असं असं असेलसं वाटतं. ते खुर्चीतल्या खुर्चीत जरा सावरून बसले. मग थोडंफार चेकअप करताना त्यांनी काही प्रश्न विचारले. जमेल तशी उत्तरं दिली. एका अर्थी पापांची कबूलीच म्हणजे.
मग ते बोलले, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा.
आणि आत त्यांची फोनाफोनी चालू असलेली काचेतून दिसते.‌ आवाज हळू आहे. मला इकडे हवाय तात्काळ दिलासा. आणि ही वातावरण-निर्मिती मला अजिबात दिलासा मिळू देत नाहीये.‌

दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरसोबत पौड रोडला दुसऱ्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये. तिथं काही टेस्ट. दोन दिवसांनी अमुक लॅबमधून रिपोर्ट मिळतील, कलेक्ट करा, असा नंतर फोनवर निरोप.

त्या दोन रात्री टक्क जागा. भयाचं सावट पूर्ण अलूफ मोडमध्ये नेतं माणसाला. जग भकास. त्यात एक मिटलेपण. रंगीबेरंगी, चहलपहल, दिलदुनिया काहीही दिसायचं बंद.

दोन दिवसांनी त्या डॉक्टरच्या लॅबमध्ये वेळेआधीच. रिसेप्शनिस्ट बोलली की पेशंट कुठाय? मी बोललो मीच पेशंट. तिच्या नजरेत कुतुहल, सहानुभूती.

डॉक्टरनी आत बोलावलं. रिपोर्टचा लखोटा हातात दिला.
बोलले, "तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. पण तुम्ही हे सिगारेट वगैरे बंद करा बरं का..! एकदम बंद करा..!"

थरथरत्या हातांनी रिपोर्ट उघडला. वाचला.‌ पुन्हा पुन्हा वाचला. नो मॅलिग्नन्सी डिटेक्टेड. सगळं पूर्ववत करणारे तीन शब्द.
काळजात एक ससा उंच उंच उड्या मारतो. आणि जीवनदायी उर्जेचा प्रवाह शरीरभर..!
खुर्चीतून उठायला लागलो तर डॉक्टर बोलले की थांबा, तोंड गोड करून जा. त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या झेन तत्वज्ञान्यासारखं हसू‌. ते बघूनच माणूस निम्मा बरा होत असावा.
मी सवयीनं बोललो की नाही, नाही, नको.
ते बोलले, "अहो घ्या. माझीपण चहाची वेळ झालीच आहे.‌ बसा."
चेहऱ्यावर तेच निर्मळ हसू.
टोटली अनोळखी व्यक्तीकडून एवढी ग्रेसफुल ट्रिटमेंट मिळाल्यावर आपल्याला उगाच सेंटी व्हायला होतं. आपण आता जरा पोक्तपणे वागायला शिकलं पाहिजे.‌

चहा पिलो. जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून उडी मारून बाहेर पडलो. तर रस्त्यावर डिसेंबरातल्या दुपारचं स्वच्छ फ्रेश ऊन. सगळं एकदम शुभ्र शुभ्र. मघाच्या काजळीचा लवलेशही शिल्लक नाही.‌
हे कुठलंतरी वेगळंच जग आहेसं वाटतंय. किंवा जग तेच आहे आणि आपण बदललोय, असंही असेल. असंच आहे ते.‌.!
साला कुणी कितीही काहीही म्हटलं तरी जग चांगलंच आहे राव..! हे लिहून फ्रेम करून ठेव.

मग त्या रात्री झोपण्यापूर्वी हेडफोनमधून एक प्रार्थना, सलगच्या सलग, कितीतरी कितीतरी वेळा :
जग जीवन, जनन मरण, हे तुझेच रूप सदय..
सृजन तूच, तूच विलय, दे प्रकाश देई अभय..
गगन सदन तेजोमय..

'आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’ -- पुस्तक अभिप्राय

असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे ...